Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर
पाण्याची गळती, धरणांतील घटता साठा, पाणीपुरवठ्याचे नियोजन, थकीत करांची वसुली, निकृष्ट रस्ते, नगरपरिषदेच्या वीजजोडणीचा कथित अनधिकृत वापर आणि शहरातील बॅनरबाजी अशा विविध नागरी प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.
कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
काही महिन्यांपूर्वी सावित्री नदीपात्रातील जलवाहिनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुरात वाहून गेल्याने नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला असून, त्याची बिलेही अद्याप थकीत आहेत. या प्रकरणात संबंधितांकडून नुकसानभरपाई मिळविण्यासाठी नगराध्यक्षांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी वजीर कोंडीवकर यांनी केली, तर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी केली. (फोटो सौजन्य – AI Created)
यापूर्वी रासायनिक प्रदूषणामुळे वापर बंद केलेल्या शेडाव डोहातील पाण्याचे नमुने तपासून त्याचा वापर करणे शक्य आहे का, याची पडताळणी करावी, असेही त्यांनी सुचविले. कुर्ले धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे २० दिवसांनी, तर कोथुर्डे धरणातील जवळपास दोन महिन्यांनी कमी असल्याचे वजीर कोंडीवकर यांनी निदर्शनास आणले. कोथुर्डे धरणातून ग्रामीण भागासाठी सोडलेले पाणी वाटेत वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पाणीटंचाईच्या काळात नवीन बांधकामांना नळजोडण्या देताना सावध भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
गतवर्षी नडगाव येथील खाण तलावातून टँकरद्वारे पाणी आणून करंजखोल जलशुद्धीकरण केंद्रात पुरवठा करावा लागला होता. यंदाही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यासाठी आर्थिक तरतूद आणि पाणीपुरवठ्याचे नियोजन आतापासूनच करावे, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते निखिल शिंदे यांनी केली. नळजोडण्यांमधील गळती तातडीने रोखण्यावरही त्यांनी भर दिला.
निविदा प्रक्रियेवरून महाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष सुनील कविस्कर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही नगरसेवकांनी प्रसिद्ध केलेल्या निविदांना अद्याप मंजुरी मिळाली नसल्याबद्दल विचारणा केली असता, कविस्कर यांनी निविदा प्रक्रिया परस्पर राबविणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. नगराध्यक्षांना विश्वासात घेऊन आणि त्यांना संपूर्ण माहिती देऊनच निविदा काढण्याची प्रक्रिया पार पाडली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.






