
यंदा रायगडावर शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) दिन थाटामाटात साजरा होणार आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना(Corona)च्या प्रादुर्भावामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्याला शिवभक्तांना हजेरी लावता आली नव्हती. मात्र, कोरोना निर्बंधांमधून सूट देण्यात आल्याने रायगड पुन्हा दुमदुमणार आहे. रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला. त्यामुळे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने १ जानेवारी २०२१ रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी ६ जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
दरवर्षी रायगडावर अत्यंत जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी मोठ्या संख्येने शिवप्रेमी रायगडावर जातात. कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रायगडावर ५-६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती (Yuvraj SambhajiRaje Chhatrapati) आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.