पाटण: शहरासह तालुक्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे. चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून पाटण-कोयनानगर रस्ता रुंदीकरणामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस, खड्डे व सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. कोयना विभागातील वाजेगाव परिसरात रुंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मालट्रक चिखलात रुतल्याने अडकून पडला होता. त्यामुळे दोन्ही बाजूकडीला वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. उभ्या पावसामध्ये जेसीबीच्या सहाय्याने मालट्रक बाजूला केल्यानंतर कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
पाटण-कोयनानगर हा कोकण विभागाला जोडणारा मुख्य मार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी उकरल्याने व खोदकाम केल्याने येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून त्यात पाणी साचले आहे. खड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. त्यामुळे कंपनीने सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवून लवकरात लवकर रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.
लाडक्या बहिणींसाठी वळवला ‘या’ विभागाचा निधी; समाज चांगलाच आक्रमक
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटणपासून ते कोयनानगर विभागातील संगमनगर (धक्का) पर्यंतचे रुंदीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून पाटण तालुक्यात सर्वत्रच पावसाची संततधार सुरू आहे.बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील वाजेगावच्या परिसरात मालट्रक चिखलात रूतून बसला होता. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने हा ट्रक काढताना अनेक अडचणी येत होत्या.
ट्रक रस्त्यावरच अडकल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर जेसीबीच्या सहाय्याने हा मालट्रक बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या सर्वात वाहनचालकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. संबंधित कंपनीने सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती पावले उचलावीत तसेच लवकरात लवकर रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांनी केली आहे.