
फोटो सौजन्य - Social Media
ठाण्यातील प्रसिद्ध स्त्रीरोग आणि बालरोग उपचार केंद्र डॉ. बेडेकर हॉस्पिटल आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या विशेष निमित्ताने डॉ. बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक अद्वितीय चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात १९२० साली प्रकाशित झालेल्या “The Women of India” या ऑटो रोथफेल्ड लिखित दुर्मिळ पुस्तकातील ज्येष्ठ चित्रकार एम. वी. धुरंधर यांनी काढलेल्या तत्कालीन भारतातील विविध प्रांत, व्यवसाय आणि समाजघटकांतील स्त्रियांच्या वेशभूषांचे चित्रसंग्रह प्रदर्शित होणार आहेत.
उद्घाटन समारंभ:
या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार असून, यावेळी ज्येष्ठ चित्रकार व कला समीक्षक सुहास बहुलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ते धुरंधर यांच्या चित्रशैलीवर व्याख्यान देणार असून, त्याचबरोबर चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करतील.
प्रदर्शनाचे वेळापत्रक:
हे प्रदर्शन पाहण्यासाठी स्थानिक लोक फार उत्सकुक असल्याचे दिसून येत आहे. ९ नोव्हेंबरपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत या प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. ९ नोव्हेंबरपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत प्राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे येथे या प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. तसेच १३ नोव्हेंबरपासून ते १५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जोशी बेडेकर कॉलेज (ठाणे कॉलेज) परिसरात या प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे.
विशेष कार्यक्रम:
१५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता, जोशी बेडेकर कॉलेजमधील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात “प्राचीन भारतातील स्त्रिया” या विषयावर सहाय्यक प्राध्यापक अंकुर काणे यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रदर्शनात “The Women of India” या दुर्मिळ ग्रंथाची मूळ प्रत देखील पाहायला मिळणार आहे. डॉ. बेडेकर कुटुंबियांनी ठाणेकर रसिकांना या ऐतिहासिक व दुर्मिळ चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.