फोटो सौजन्य- प्रतिनिधी
चिपळूण (प्रतिनिधी):– माझ्यावर अन्याय झाला असे आपण म्हणणार नाही. परंतु, या ठिकाणी शिवसेना प्रबळ असताना व त्यांचा मतदार असताना शिवसेनेला उमेदवारी मिळालेली नाही. एखाद्या शिवसैनिकाला उमेदवारी मिळाली असती. तर तो निवडून येऊ शकला नसता का? या पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण आपली खंत बोलून दाखवली आहे.
तो शब्द पूर्ण केल्याचे समाधान
महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांनी सोमवारी वसुबारसेच्या शुभ मुहूर्तावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण हेदेखील उपस्थित होते.यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांना उमेदवारी मिळाल्याबद्दल अभिनंदन करताना उमेदवारी अर्ज भरण्याआधी झालेली गर्दी पाहता आ. निकम यांचा विजय निश्चित आहे. या मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार राहिलेलो आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दोन वेळा प्रतिकूल परिस्थितीत संधी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आपण चिपळूणमध्ये भगवा फडकवू, असा शब्द दिला होता. तो शब्द पूर्ण केल्याचे आपल्याला समाधान आहे.
प्रथमच चिपळूण- संगमेश्वरमध्ये शिवसेनेचा उमेदवार असणार नाही
मात्र, आता या मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवारी न मिळाल्याबाबत अधिक स्पष्टपणे बोलताना ते म्हणाले की, आपण गट- तट मानत नाही. इथे शिवसेनेची ताकद असतांनासुद्धा आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुका पाहता प्रथमच चिपळूण- संगमेश्वरमध्ये शिवसेनेचा उमेदवार असणार नाही. सदानंद चव्हाण किंवा आ. शेखर निकम यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली नसून ती परिस्थिती राज्यातील राजकीय रणनीतीमुळे उद्भवली आहे. या ठिकाणी सदानंद चव्हाण यांना उमेदवारी मिळावी ते आमदार व्हावेत, असे मुळीच नाही. आमदारकीचे फायदे- तोटे देखील आम्ही बघितलेले आहेत.शेखर निकम यांना मिळालेल्या उमेदवारीबद्दल मुळीच नाराजी नाही, असे स्पष्ट करतांना या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार शेखर निकम यांच्याबरोबर असल्याची ग्वाही यावेळी शेवटी दिली.
चिपळूण मतदारसंघ
रत्नागिरीमध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील चिपळूण मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम निवडणूकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या सामना शरद पवार गटाचे प्रशांत यादव यांच्याशी होणार आहे. चिपळूणमध्ये 2014 पर्यंत शिवसेनेचे वर्चस्व होते. सदानंद चव्हाण यांनी 2009 आणि 2014 मध्ये या मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. 2019 च्या निवडणूकीमध्ये त्यांचा शेखर निकम यांनी जवळजवळ 30 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला होता. गेली 30 वर्षे या मतदारसंघात धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार असे मात्र ही पहिलीच निवडणूक आहे ज्यात शिवसेनेकडून उमेदवार नसणार आहे.