शिवसेनेचे मुंबईचे नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर यांनी ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी मोबाईलचा वापर केल्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून निवडणूक आयोगाने आज एक मोठा खुलासा केला आहे. ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागत नाही, असे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. याचदरम्यान रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला
लोकसभा निवडणूक होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र, ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यातील वादाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे मुंबई उत्तर पश्चिम मध्य लोकसभा उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय सध्या आश्वासनाप्रमाणे दिसत आहे. रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तीकर यांचा ४८ मतांनी पराभव केला. मात्र, यानंतर ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तसेच रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधाच मतमोजनी केंद्रात मोबाईल नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर आता रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रीया देत शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. “परभाव जिव्हारी लागल्यामुळे हा रडीचा डाव सुरु आहे”, अशा हल्लाबोल वायकरांनी ठाकरे गटावर केला.
काय म्हणाले रवींद्र वायकर?
“एक हजार पोलिस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी आणि प्रत्येकी 20 उमेदवार मतदान केंद्रावर होते. पण रवींद्र वायकर आत जाऊन काहीतरी वेगळे कसे करू शकतात? हे कसे शक्य आहे हे मला माहीत नाही. काय चाललयं? फक्त रडीचा डाव चालला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे त्यांचं ट्विटपासून सर्व काही सुरू झाले. या रडीच्या डावाला मी महत्व देत नाही. त्यांना वाटेल ते करुद्या. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या. ती योग्य पद्धत होती.कोणी कोणाचा नातेवाईक आहे, म्हणून त्याने ते ईव्हीएम हॅक केलं, असं ईव्हीएम मशीन हॅक करता येत का? हे जे काय चाललं आहे, हा रडीचा डाव आहे. त्यामुळे मला यावर उत्तर द्यावसं वाटत नाही, तरीही मी यावर स्पष्टीकरण दिलं आहे”, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.