लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुनर्पडताळणी अद्यापही सुरुच; 'इथं' तब्बल 3500 महिला ठरल्या बाद
यवतमाळ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेच्या माध्यमातून हजारो महिलांना 1500 रुपये दरमहा दिले जात आहे. त्यात आता हजारो अपात्र महिलांनी घुसखोरी केल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे आता निकषाच्या बाहेर असलेल्या महिलांना योजनेतून बाद करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी शासन स्तरावर काही ठराविक निकष ठरण्यात आले आहेत. अशा बहिणींची जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच फेरपडताळणी केली असून, त्यातील साडेतीन हजार अपात्र महिलांचा अहवाल आता राज्य शासनाकडे पाठवण्यातही आला आहे. त्यामुळे साडेतीन हजार महिला ‘लाडकी बहीण योजने’च्या व्याख्येतून ‘आऊट’ होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही लोकप्रिय योजना सुरू करण्यात आली होती.
निवडणुकीच्या घाईत तत्कालीन सरकारने महिलांकडून बेसुमार अर्ज भरून घेतले होते. तेव्हा त्यांची योग्य पडताळणीसुद्धा करण्यात आली नव्हती. मात्र, वर्ष उलटून गेल्यावर या योजनेवर होत असलेला गडगंज खर्च लक्षात घेता सरकारने अपात्र लाभार्थ्यांची यादीच बाहेर काढली. अशी यादी संबंधित जिल्हा परिषदांकडे पाठवून अंगणवाडीताईंच्या माध्यमातून या यादीतील लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन फेरपडताळणी करण्यात आली.
कोण-कोण ठरलंय अपात्र?
एकाच रेशन कार्डवर अधिक महिलांची नावे होती. त्यातील दोघींनाच लाभ सुरू राहणार असून, तिसऱ्या महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेतून कट होणार आहे. जिल्ह्यात अशा १५७९ महिला अपात्र ठरल्या आहेत. ६५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या महिलाही या योजनेसाठी पात्र नाहीत. मात्र, जिल्ह्यात अशा २१८२ महिला आतापर्यंत योजनेत लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे.
यवतमाळमध्ये अशीच यादी समोर
अशीच यादी यवतमाळ जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली होती. त्या यादीची अंगणवाडीताईंनी गावोगावी तपासणी केली. त्यातून जिल्ह्यात तब्बल ३ हजार ७६० महिला या योजनेसाठी अपात्र असल्याचे आढळून आले आहे. अंगणवाडीसेविकांकडून गोळा केलेली ही माहिती आता जिल्हा परिषद प्रशासनाच्या हाती आली आहे. हा एकत्रित अहवाल आता राज्य शासनाकडे रवाना करण्यात आला आहे.
आता हफ्ते थांबणार
यवतमाळ जिल्ह्यात या योजनेसाठी सुरूवातीला 7 लाख १९ हजार ८८० अर्ज दाखल झाले होते. यापैकी सहा लाख ९२ हजार ५६३ अर्ज पात्र ठरले होते. २७ हजार ३१७ अर्ज अपात्र ठरले. पात्र ठरलेल्या ६ लाख ९२ हजार महिलांना गेले वर्षभर दरमहा दीड हजारांचे हफ्ते वाटप झाले. आता मात्र त्यातील साडेतीन हजार महिला वगळल्या जाणार आहेत. आता त्यांचे दीड हजारांचे हप्ते थांबणार आहेत.