
रेवती सुळे–सारंग लखानी विवाह सोहळ्यात दिग्गजांची मांदियाळी
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाहसोहळा (रेवती सुळे–सारंग लखानी विवाह) आज मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. भाजप आमदार आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांच्यासोबत रेवती सुळे विवाहबंधनात अडकली. या शाही विवाहसोहळ्याला देशातील राजकीय, सामाजिक, उद्योग, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत शुभेच्छांचा वर्षाव केला.
रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह विविध पक्षांतील नेत्यांनी हजेरी लावली.
याशिवाय उद्धव ठाकरे कुटुंब, राज ठाकरे कुटुंब, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रफुल पटेल, सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे, बाळासाहेब थोरात, विशाल पाटील, अमोल कोल्हे, धीरज देशमुख, शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक राजकीय मान्यवर उपस्थित होते.
या विवाहसोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उद्योगविश्वातील दिग्गजांची उपस्थिती. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांनी उपस्थिती लावली. तसेच सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पूनावाला यांच्यासह अनेक नामांकित उद्योजकांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
विवाहसोहळ्यात बॉलिवूड कलाकारांची उपस्थितीही विशेष चर्चेचा विषय ठरली. महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी सपत्नीक उपस्थिती लावली. दिग्दर्शक करण जोहर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. तसेच शाहरुख खाननेही कार्यक्रमात उपस्थित राहून वातावरणात रंगत आणल्याची चर्चा होती.
‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय
रेवती सुळे यांचे पती सारंग लखानी हे उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्याही उपस्थितीने या विवाहसोहळ्याची शोभा वाढली.
देशातील विविध विचारधारांचे नेते, उद्योगपती, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकाच छताखाली आल्याने रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला. राजकीय मतभेद बाजूला ठेवत अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.