हस्तांतरित करण्यासंदर्भातही विचारविनिमय
यावेळी त्यांनी रुग्णालयातील उपलब्ध सुविधा, रुग्णसंख्या, डॉक्टर व कर्मचारी यांची उपलब्धता तसेच औषध पुरवठा यंत्रणेची माहिती घेतली. रुग्णालयाचे प्रभारी सहयोगी प्राध्यापक व डेंटल सर्जन डॉ. आर. बी. हजारे यांची भेट घेऊन आमदार पाटील यांनी रुग्णालयाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा केली तसेच रुग्णालयाची इमारत तासगाव पालिकेकडून मिरज येथील शासकीय रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातही यावेळी विचारविनिमय झाला.
मनुष्यबळ व सुविधा वाढवण्याची गरज
रुग्णालयात सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कॉट संख्या वाढवण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात किंवा इतर ठिकाणी धावपळ करावी लागू नये, यासाठी स्थानिक पातळीवरच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. हजारे यांनी रुग्णालयाच्या कार्याचा आढावा देताना येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह केला. शेजारील चार जिल्ह्यांच्या तुलनेत तासगाव येथील रुग्णालयात सर्वाधिक रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले, मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनुष्यबळ व सुविधा वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
तासगाव तालुक्यातील रुग्णांना दिलासा
या पाहणी दौऱ्यात मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, अॅड. तुकाराम कुंभार, स्वप्नील जाधव, अरुण साळुंखे, अभिषेक देशिंगकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डायलिसीस सेंटर व रक्तपेढी सुरू होण्यामुळे तासगाव तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, आरोग्य सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.






