(Photo - X)
सातारा, दि. २३ / प्रतिनिधी : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यानंतर साताऱ्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन ठिकाणांहून १ लाख ८७ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, तीन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एका तेल डेपोस २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी १ ऑक्टोबर रोजी अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देत अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली होती. सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. १९ ऑक्टोबरच्या कारवाई अहवालानुसार, राजमाने तेल डेपोमधून १ लाख ६३ हजार रुपयांचा माल जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमधील साईबाबा कॅन्टीनचा परवानाही निलंबित झाला, तर होगार्ड मिल्कचा परवाना १२ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.
पोवई नाका येथील लाटकर कंदी पेढा येथून २४ हजार १२० रुपयांचा खवा जप्त करण्यात आला. डी.के. तेल डेपोला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. दरम्यान, विविध हॉटेल्स, मिठाई दुकाने आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधून खवा, हळद, तेल व अन्य पदार्थांचे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.
प्रशासनाच्या कारवाईनंतर मनसेने समाधान व्यक्त केले असले, तरी तपासणीपुरती मोहीम मर्यादित न ठेवता दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिवाळीत भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राहुल पवार यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड न करता प्रशासनाने सातत्याने तपासणी करावी, अशी मनसेची भूमिका आहे.
Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?
Ans: दोन ठिकाणांहून एकूण १ लाख ८७ हजार १२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
Ans: राजमाने तेल डेपो आणि साईबाबा कॅन्टीनचे परवाने निलंबित करण्यात आले, तर होगार्ड मिल्कचा परवाना १२ दिवसांसाठी निलंबित करण्यात आला.
Ans: दिवाळीत भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी दिला आहे.






