Mahabaleshwar Municipality
महाबळेश्वर : दिवाळीच्या सुट्यांमध्ये पर्यटकांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन महाबळेश्वर नगरपालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणांविरोधात कारवाईची सुरुवात केली आहे. मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या महात्मा गांधी मार्गांवर उभारण्यात आलेल्या टपऱ्या हातगाड्या हटविण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविण्यात आली. त्यामुळे हा रस्ता अतिक्रमणांच्या विळख्यातून मोकळा झाला. या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता या मोहिमेच्या कारवाईचा हातोडा बाजारपेठेतील अतिक्रमणांवरही पडणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असून, दिवाळीच्या हंगामात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत शहरातील रस्ते मोकळे ठेवणे, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करणे आवश्यक आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्यां व दुकाना समोर रस्त्यावर झालेलं अतिक्रमण यामुळे नागरिकांसह पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर पालिका प्रशासनाने या अतिक्रमणांविरोधात कारवाईचा बडगा उगारला.
महाबळेश्वर शहरात सुमारे ४५ कोटी रुपयांच्या सुशोभीकरणाची कामे झाल्याचे सांगितले जात असतानाही बाजारपेठेतील अतिक्रमणे, रस्त्यांवरील अडथळे आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते. बाजारपेठेच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच काही व्यापाऱ्यांनी दुकानांसमोरील जागेत रस्त्यावर अतिक्रमण केल्याच्या, तसेच काही ठिकाणी गटारांवर फरश्या ठेवून पादचारी आणि पाण्याच्या निचऱ्यास अडथळे निर्माण केल्याच्या तक्रारी होत्या.
शहराच्या सुशोभीकरणासाठी मोठा खर्च होत असताना प्रत्यक्षात व्यापारी वर्गाकडून बाजारपेठेचे बकालीकरण सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. पर्यटनस्थळाची ओळख जपण्यासाठी केवळ सुशोभीकरणाची कामे करून चालणार नाही, तर त्यानंतर सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्याची जबाबदारीही प्रशासनाने पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
बाजारपेठेतील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला असताना तत्कालीन प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन बाजारपेठेसह शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.त्यांनी या साठी धाडसी कारवाईची मोहीम राबवून शहर अतिक्रमण मुक्त केले होते परंतु त्या नंतर प्रशासनाने या बाबी कडे सपशेल दुर्लक्ष केल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर ठीक ठिकाणी पुन्हा नव्या टपऱ्या उभ्या राहू लागल्याचे चित्र दिसू लागले. परिणामी, अतिक्रमण हटाव मोहिमेचे बारा वाजले पालिकेने तो विभागच बंद केला की काय अशी शंका व्यक्त केली जात होती. आता शहराचे पुढे काय होणार, प्रशासन ही कारवाई करणार की नाही याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती.
या पार्श्वभूमीवर पालिकेने मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या महात्मा गांधी रस्त्यावरील हातगाड्या व टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यासाठी केलेल्या कारवाईमुळे या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, एका दिवसाच्या कारवाईने प्रश्न सुटणार नसून, अतिक्रमणमुक्तीची ही मोहीम शहरभर सातत्याने राबविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
मुख्य रस्त्यावरील टपऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर आता शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील अतिक्रमणांकडेही पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दुकानांसमोरील सार्वजनिक जागेचा अनधिकृत वापर, रस्त्यावर ठेवण्यात येणारे साहित्य, गटारांवरील अडथळे आणि पादचाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या वस्तूंमुळे बाजारपेठेत ये-जा करताना अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत.
शहरातील ‘नो हॉकर्स, नो व्हेईकल झोन’ची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल, तर त्यासाठी सर्वांना समान नियम लागू करणे आवश्यक आहे. केवळ रस्त्याच्या एका भागातील टपऱ्या हटवून थांबण्याऐवजी बाजारपेठेसह शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागांची पाहणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Satara News : सातारा पालिकेच्या वसुलीचे मोठे आव्हान; ३०.५८ कोटींची तूट भरून काढण्यासाठी धावपळ!






