मुंबई : संतसहित्य (Saint Literature) आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक डॉ. रामचंद्र देखणे (Dr. Ramchandra Dekhane) (वय ६६) यांचे हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने सोमवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. वारकरी संप्रदायाची (Warkari Sect) परंपरा असलेल्या घरामध्ये देखणे यांचा जन्म झाला. बी. एस्सी. आणि एम. ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादन केली. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये (Pimpri-Chinchwad Navnagar Development Authority) जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. ‘संत विचार प्रबोधिनी‘ ही दिंडी घेऊन देखणे अनेक वर्षे सातत्याने पंढरीची पायी वारी करीत होते.
डॉ.रामचंद्र देखणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या संत साहित्याचा आणि संत परंपरेचा एक चिंतनशील अभ्यासक आपण गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, भारूडातील तत्वज्ञान या विषयात डॉ.रामचंद्र देखणे तज्ज्ञ होते. त्यांच्यामुळे भारूड हा वाङमय प्रकार महाराष्ट्राला नव्याने पुन्हा समजून घेता आला. महाराष्ट्राच्या संत साहित्य परंपरेचे ते आधुनिक काळातील पाईक होते. ईश्वर त्यांना सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या आणि वाचकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुनगंटीवार म्हणाले.