बारामती: बारामती मतदारसंघातून शरद पवार पक्षाकडून युगेंद्र पवार विरूद्ध अजित पवार असा लढा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार सातत्याने शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहिलेले दिसले. अनेकदा त्यांच्या समर्थकांनीही शरद पवार यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी मिळाली आणि आजच त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील होत्या. युगेंद्र पवार यांचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीने युगेंद्र पवार यांच्या अर्ज आज आम्ही दाखल केला. त्यांच शिक्षण परदेशात झाले असून ते उच्चशिक्षित आहेत. प्रशासन आणि व्यवसायाचा त्यांना चांगला अनुभवही आहे. पक्षाने जाणकार तरुणाला बारामतीतून संधी दिली आहे. बारामतीची जनता या नव्या पिढीच्या नेतृत्वाच्या पाठिशी उभे राहतील, असा मला विश्वास आहे.
हेही वाचा: Baramati Assembly Election 2024: बारामतीचा आखाडा रंगणार; अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार मैदानात
राजकीय वाटचालीसाठी युगेंद्र पवार यांना कोणता कानमंत्र द्याल, असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले, 57 वर्षांपूर्वी मी बारामतीच्या तहसील कार्यालयात माझा उमेदवारी अर्ज भरायला गेलो होतो. त्या दिवसापासून आजपर्यंत नेहमीच जनतेने मला निवडून दिले, एका व्यक्तीला सलग लोकप्रतिनीधी होण्याची संधी इथल्या जनतेने दिली. याचं प्रमुख कारण म्हणजे जनतेशी असलेली बांधिलकी.
राजकारणात येणाऱ्या तरुण पिढीतील उमेदवारांनीही जनतेशी असलेली बांधिलकी कायम ठेवावी. विनम्रता राखावी. जनतेची सेवा करण्याच संधी मतदारांनी दिल्यानंतर ती विनम्रतेने स्वीकारून त्यांच्या सेवेत सातत्याने जागृत राहावे, एवढाच माझा नव्या पिढीला सल्ला आहे, असंही शरद पवार यांनी नमुद केलं.
हेही वाचा: स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार
याचवेळी त्यांनी जागावाटपासंदर्भातही भाष्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीतील दोन पक्ष आग्रही आहेत. त्या ठिकाणी आम्ही दोघांनाही अर्ज भरण्यास सांगितला आहे. त्या जागांसंदर्भात पुन्हा चर्चा केली जाईल आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असल्याने तोपर्यंत यावर निश्चितच मार्ग काढला जाईल. तसेच माढा विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा पूर्ण झाली आहे. तेथील उमेदवार आज जाहीर होतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेली साडेचार- पाच वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती. पण गेल्या चार-पाच महिन्यात ज्या सुविधा सरकारने आणल्या. त्यावेळी नाही. पण लोकसभा निवडणुकीनंतर सरकारला बहीण-भावाची आठवण होऊ लागली. लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना धडा शिकवला, ता विधानसभेलाही जनता असाच धडा त्यांना शिकवेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा: गॅरी कर्स्टनचा पाकिस्तान क्रिकेट संघाला राम राम! PCB सोबत झाले मतभेद
बारामतीतील मतदारांबाबत जेवढी माहिती मला असेल तेवढी क्वचितच इतरांनाही असेल. पण मला बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. मला महाराष्ट्राच्या राजकाराणात शक्ती आणि बळ देण्याचं काम बारामतीच्या जनतेने केले. त्याची सुरूवात 1965 पासूनच झाली ती आजतागायत सुरू आहे.