Vijay Vadettiwar News: गेल्या आठवड्यात राज्यातील ७२ क्लास वन अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्य सरकारच्या शासकीय यंत्रणेत अनेक उच्च अधिकारी आणि काही मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांनाही अडचणीत आणले होते. पण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ना हनी आहे ना ट्रॅप, असे सांगत नाना पटोलेंचा दावा फेटाळून लावला.
देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर आता पुन्हा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. “महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार हनी ट्रॅपच्या माध्यमातून स्थापन झालं. हनीट्रॅप हाच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्याचा मुख्य डाव होता. राज्याचे सत्ताधारी व विरोधक दोघांकडेही याची सर्व माहिती आहे. असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. पण त्याचवेळी त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, शिंदे सरकारच्या स्थापनेविषयी नव्याने चर्चांना आणि आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्तांतर ‘सीडी’मुळेच घडले आणि या प्रकरणामध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश आहे. “काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘हनी नाही आणि ट्रॅपही नाही’, पण याबाबत मोठी माहिती सरकार आणि विरोधकांकडे आहे,” असे म्हणत वडेट्टीवारांनी फडणवीस यांच्या विधानावर प्रत्यक्षरित्या पलटवार केला.
टीम इंडियाला झटका! इंग्लंडहून मायदेशी परतला ‘हा’ खेळाडू; न खेळण्याचे कारण आले समोर
ते पुढे म्हणाले, “शिंदेंचं जे सरकार आलं, ती जी काही सत्तापालट झाली, ती एका सीडीमुळे झाली. एवढं मोठं ते प्रकरण आहे.” तसेच, “आजचे काही अधिकारी, आजी-माजी मंत्री या प्रकरणात सामील आहेत. खूप बड्या व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. यावर अधिक बोलण्याची गरज नाही, कारण जेव्हा दाखवू तेव्हा तिकीट लावूनच ते चित्र दाखवावं लागेल,” अशा शब्दांत त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर हनीट्रॅप आणि गुप्त सीडी संदर्भातील या आरोपांची सखोल चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू शकते.