*नियोजनाच्या अभावामुळे ऐन उन्हाळी हंगामात एसटीला अपेक्षित उत्पन्न नाही*
सातारा : उन्हाळी हंगाम संपत आला तरीसुद्धा एसटीला अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात अपयश येताना दिसत असून, प्रतिदिन तीन कोटींनी उत्पन्नात कमी मिळत असल्याचे दिसून येत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
श्रीरंग बरगे हे काँग्रेस भवन, सातारा येथे झालेल्या एसटी कामगारांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ केली असताना उद्दिष्टांच्या प्रमाणे १ मे ते ८ मे या ऐन उन्हाळी हंगामातील उत्पन्नाचा आलेख पहिला तर प्रतिदिन सरासरी ३४ कोटी रुपये इतके उत्पन्न मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र ३१ कोटी रुपये इतके उत्पन्न प्रतिदिन मिळाले असून, ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात व्यवस्थापनाला अपयश आले आहे.
अजूनही प्रतिदिन ३ कोटी रुपयांनी उत्पन्न कमी मिळत असल्याचे दिसून येत असून राज्य भरातील एसटीच्या एकूण उत्पन्नाचा एकूण आढावा घेतला. तर १ मे ते ८ मे या कालावधीत उद्दिष्टाप्रमाणे फक्त नागपूर विभागाने उत्पन्न मिळविले आहे. बाकी कुठल्याही विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश मिळाले नसून वाहकाने उत्पन्न कमी आणले तर त्याला विचारणा होते. मग प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे घडत असताना सुद्धा कुणावरही कारवाई का केली जात नाही? असा सवालही बरगे यांनी वेळी बोलताना केला.
मध्यवर्ती कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली
कामकाज सुरळीत पार पडावे व उत्पन्नवाढीत मदत व्हावी यासाठी अनेक विभागात बढती परीक्षा घेण्यात आल्या असून, वाहतूक नियंत्रक व सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदाची बढती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऐन उन्हाळी हंगामात बढती देण्यात आली नाही. मार्ग तपासणी पथक किंवा चालक, वाहकाना कामगिरी लावण्यासाठी सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदातील बढती परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्याना वापरण्याचे मध्यवर्ती कार्यालयाचे आदेश असताना सुद्धा अजूनही त्यांना वापरले जात नाही. हे दुर्दैवी असून उत्पन्न मिळावे व कामकाज सुरळीत होण्यासाठी बढती परीक्षा घेण्यात आल्या आहेत.