धक्कादायक! ट्रेलरच्या धडकेने शिक्षिकेचा मृत्यू; पुण्यातील घटना
कात्रजकडून चांदणी चौकाकडे येत असताना वारजेमधील महिंद्रा शोरूमसमोर ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने वर्षा किशोर घमंडी (वय ४६, रा. वारजे, माळवाडी) यांचा जागेवर मृत्यू झाला.
पुणे : कात्रजकडून चांदणी चौकाकडे येत असताना वारजेमधील महिंद्रा शोरूमसमोर ट्रेलरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने वर्षा किशोर घमंडी (वय ४६, रा. वारजे, माळवाडी) यांचा जागेवर मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका महिलेला जागेवर भोवळ आली होती.
वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज शेडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा घमंडी या वारजे पुलावरून चांदणी चौकाच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून (एमएच १२ एलएम ४८५३) जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरचा (एमएच ४६ एएफ ८५८९) धक्का लागल्याने खाली पडल्या. ट्रेलरचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून व पायावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वर्षा घमंडी या पेशाने शिक्षिका होत्या. एका कामानिमित्त त्या कात्रज भागात गेल्या होत्या, तेथून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. घमंडी यांना कनिका नावाची एकुलती एक मुलगी आहे. त्यांच्या पतीचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे. आई-वडील दोघांचेही छत्र हरविल्याने कनिका आता माता-पित्याच्या प्रेमाला पोरकी झाली आहे.
Web Title: Teachers death due to collision with trailer incident in pune nrdm