Team Manyavar and Team Aquarius top the Ashok Ruia Memorial Winter National Bridge Championship
पुणे : आपल्याकडे ब्रिज हा खेळ जास्त प्रचलित नाही तरीही विदेशात या खेळाची मोठी क्रेझ आहे. पत्त्यांचा डावावरून हा खेळ खेळला जातो. एक माईंड गेम म्हणून याकडे विदेशात पाहिले जाते. आता पूना रिजन ब्रिज संघटना यांच्या वतीने आयोजित व ब्रिज फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय), महाराष्ट्र ब्रिज संघटना (एमबीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या अशोक रुईया मेमोरियल हिवाळी राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत टीम मान्यवर आणि टीम ॲक्वेरियस यांनी सांघिक गटात पहिल्या चार फेऱ्या अखेर पहिल्या दोन क्रमांकाची निश्चिती करताना आगेकूच केली.
चार फेऱ्याअखेर आघाडीचे स्थान
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सांघिक विभागात अनिल पाध्ये, आनंद सामंत, सुंदरम श्रीधर, जितू सोलानी व राजेश दलाल यांचा समावेश असलेल्या टीम मान्यवर संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत 59.63 गुणांची कमाई करताना चार फेऱ्याअखेर आघाडीचे स्थान पटकावले.
भारतीय संघाच्या निवड चाचणीत थेट प्रवेश
टीम ॲक्वेरियस संघ 57.20गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर, तर धामपूर शुगर मिल्स संघ 55.38गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. स्विस लीग फॉरमॅट नुसार सात फेऱ्यांची स्पर्धा असलेल्या 12 पटावर उरलेल्या तीन फेऱ्या उद्या खेळवल्या जाणार आहेत. या सांघिक गटातील विजेत्या संघाला जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवड चाचणीत थेट प्रवेश मिळणार आहे.
मिक्स पेअर्स गटाच्या स्पर्धेत 83 जोड्यांनी घेतला भाग
मिक्स पेअर्स गटाच्या स्पर्धेत 83 जोड्यांनी भाग घेतला असून अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये 50पटांवर झालेल्या सामन्यात कामना शर्मा व पियूष बारोई या जोडीने आज दिवस अखेर अव्वल स्थान पटकावले. तर, संदीप करमरकर व मेरीयन करमरकर यांनी दुसऱ्या स्थानावर आहे. या गटातील उर्वरित फेऱ्या उद्या पार पडणार आहेत.