ठाणे /स्नेहा जाधव,काकडे : मुंब्र्यातील मौलाना हकीम अजमल खान रूग्णालयात गेले कित्येक दिवस अनेक समस्यांना रुग्ण सामोरे जात असल्याचं खंत व्यक्त केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार शमीम खान, शानू पठाण यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून हे रूग्णालयात आता अद्ययावत उपचार यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. तसेच, ठाणे महानगर पालिका परिक्षेत्रातील रूग्णांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत.
मुंब्र्याच्या मौलाना हकीम अजमल खान रुग्णालयातील सुविधांबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. ही बाब डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबधित खात्याशी पत्रव्यवहार करून वैद्यकीय सुविधा देण्याबाबत सूचना केल्या होत्या. याबाबत सय्यद अली अश्रफ (भाई साहब) , शमीम खान यांनी जोरदार पाठपुरावा केला. त्यानंतर उपायुक्त उमेश बिरारी आणि वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी नुकतेच एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस सय्यद अली अश्रफ, शमीम खान, शानू पठाण यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.
या बैठकीत मुंब्र्याच्या मौलाना हकीम अजमल खान रुग्णालयाचे संचालन करणाऱ्या प्लॅटिनम हाॅस्पीटलच्या व्यवस्थापनास शमीम खान यांनी चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर, सबंध ठाणे शहरातील रूग्णांना मोफत उपचार, ठाणे शहराबाहेरील रुग्णांवर विविध योजनेंतर्गत उपचार करणे; परराज्यातील रुग्णांवर कमी दरात उपचार करणे; महात्मा जोतिबा फुले आरोग्यदायी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी; ओपीडी रुग्णांसाठी औषध वितरणासाठी खिडक्या वाढविणे; विशेषज्ज्ञांची नेमणूक करणे; आपत्कालीन कक्षात एमबीबीएस डाॅक्टर तैनात करणे; आवश्यकतेनुसार तत्काळ शस्त्रक्रिया करणे; जनसंपर्क अधिकारी नियुक्त करणे; रुग्णालयातील सुविधांचा फलक लावणे; नोकरभरती करणे; सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देणे; दिवसातून तीन वेळा साफसफाई करणे आदी मागण्या शमीम खान यांनी लावून धरल्या. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आदेश उपायुक्त बिरारी यांनी दिले.
दरम्यान, मुंब्र्याच्या मौलाना हकीम अजमल खान रूग्णालयात सुविधा पुरविण्यासाठी आपण डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार पाठपुरावा करीत होतो. आता या लढ्याला यश आले आहे. त्याबद्दल आपण संबधित अधिकाऱ्यांचे आभार मानत आहोत, असे शमीम खान यांनी सांगितले.