ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्तिभाव नव्हे तर, संस्कृती, परंपरा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा उत्सव आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल, रासायनिक रंग यांच्या अतिरेकी वापरामुळे या उत्सवावर प्रदूषणाचे सावट पसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कलासक्त कैलास देसले या कुटुंबाने बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक आरास बनवुन भाविकांसाठी निसर्गस्नेही मखराचे विविध पर्याय उपलब्ध केले आहेत.
ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाजवळील देसले यांच्या हेरंब आर्टसच्या कार्यशाळेत गेली अनेक वर्षे गणपती बाप्पाची मखर तयार केली जात आहेत. या कामात कैलास देसले यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मनिषा तसेच मुलगे भाग्य आणि यश यांचाही उत्साही सहभाग असतो. कटींगपासून फिटींगपर्यंत, नक्षीकामापासून रंगसजावटीपर्यंत संपूर्ण कुटुंबच या मखर कार्यात रंगलेलं आहे. चित्रकार असलेला भाग्य विविध पॅटर्न्स साकारतो, तर बासरीवादक यश मंडपाची कलात्मक सजावट करतो. कैलास देसले यांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून केलेल्या अनुभवाचा वापर बाप्पांची विविधारंगी मखर साकारण्यात सहज दिसून येतो.
यंदाच्या सजावटीचा केंद्रबिंदू आहे, बांबूची चटई. बांबू ही नैसर्गिक, टिकाऊ आणि वेगाने वाढणारी सामग्री असल्याने ती पर्यावरणपूरक सजावटीसाठी आदर्श मानली जाते. बांबूच्या चटईला रंग देऊन, नक्षीकाम करून, पाने-फुले-मातीचे दिवे जोडून मंदिराचा आकार देण्यात आला आहे.
पौराणिक छत्र, झुंबर, कोकणातील मंदिराची झलक, कापडी झालर आणि लाकडी पट्ट्यांनी सजलेले सिहासन आदी कलात्मक गोष्टींनी या आरास अधिकच देखण्या आणि आकर्षक दिसत आहेत. बाजारात चकाकणाऱ्या थर्माकोल आणि रासायनिक रंगांच्या आराशीत, ‘देसले’ कुटुंबाचा हा बांबूच्या चटईतून साकारलेला बाप्पाचा दरबार खरे तर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उद्बोधक उदाहरण ठरले आहे.”सण साजरा करताना निसर्गाचं भान ठेवणं हीच खरी संस्कृती आहे. ही आरास केवळ सजावट नाही, तर पुढच्या पिढीसाठी पर्यावरण बचावाचा संदेश आहे,”