समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड... कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक
रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये पोहोचली, पण पुढच्याच क्षणी घडलं धक्कादायक; नागरिकांनी चालकाला धरलं धारेवर
कल्याण-शीळ रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याचा त्रास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना होतो. याप्रकरणी आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वाहतूक विभागातील काही अधिकारी पैसे घेऊन अवजड वाहने सोडत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा देखील मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र राजू पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे आता सर्वत्र चर्चा सुरु झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मनसेच्या वतीने सात दिवस आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान ६४ वाहनांची तोडफोड झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही काळ वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली होती; मात्र आता पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. “वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही, तर यापुढे गाड्या आणि टोलनाकेही फोडू,” असा इशारा मनसे नेते राजू पाटील यांनी दिल्याचे सांगितलं जात आहे.
आजचे आंदोलन हा केवळ इशारा असून, प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील भूमिका अधिक आक्रमक असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कल्याण-शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि वाहतूक विभाग आता कोणती पावले उचलतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






