फोटो सौजन्य- प्रतिनिधी
समीर पिंपळकर / दापोली: साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी पालगड संचलित पूज्य साने गुरुजी विद्यामंदिर,पालगड व मा. कपिल पाटील (माजी शिक्षक आमदार मुंबई) यांच्या पुढाकाराने साने गुरुजींच्या जन्म गावी साने गुरुजी स्मृतीभवन येथे जिल्ह्यातील साने गुरुजींचे अनुयायी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी असे सर्वांनी मिळून साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” हे साने गुरुजींचे गीत सर्वांनी एका सुरात म्हणत साने गुरुजींना अभिवादन केले.साने गुरुजी स्मृतिभवन येथे सर्वांनी मिळून आदरांजली वाहिल्यानंतर पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर पालगड प्रशाळेतील साने गुरुजींच्या प्रतिमेला मान्यवर कपिल पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमाला कपिल पाटील, प्रसिद्ध लेखक व कवी प्रवीण बांदेकर ,अशोक बेलसरे रत्नागिरी जिल्हा शिक्षक भारती चे अध्यक्ष, नवनाथ गेंड महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती रत्नागिरी चे अध्यक्ष, जयवंत पाटील राष्ट्र सेवादल चे विश्वस्त , साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद रावजी केळकर आदी उपस्थित होते.
साने गुरुजी एज्युकेशन सोसायटी पालगडचे अध्यक्ष शरदरावजी केळकर यांनी मा. कपिल पाटील व प्रविण बांदेकर यांचे शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. साने गुरुजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. अशोक करंदीकर यांनी नवनाथ गेंड, अशोक बेलसरे यांचा यथोचित सत्कार केला तसेच संचालक मंगेश गोंधळेकर यांनी जयवंत पाटील यांचा सत्कार केला.शाळेला क्रीडा साहित्य दिल्याबद्दल शाळेच्या वतीने साने गुरुजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक दिनेश गायकर यांचा सत्कार प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
माणसांवर प्रेम करावे म्हणजे देश प्रेम होय- साने गुरुजी
यानंतर कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. साने गुरुजींचे विचार व मूल्यांची जोपासना करावी,माती वर प्रेम न करता माणसांवर प्रेम करावे म्हणजे देश प्रेम होय. सर्वांवर प्रेम करण्याची गरज आहे म्हणजे भेदभाव कमी होईल. संत ज्ञानेश्वरानंतर महाराष्ट्राची दुसरी माऊली म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजी जयंती, सावित्रीबाई फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा थोरामोठ्यांच्या जयंतीनिमित्त घराघरात गोड पदार्थ केला पाहिजे म्हणजे मुलांना कळेल आज काहीतरी चांगला दिवस आहे.पालगड च्या रक्तात, विचारात साने गुरुजी असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्वतःसाठी सर्वच जगतात पण इतरांसाठी जगणारे साने गुरुजी
लेखक प्रवीण बांदेकर यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना एखाद्या गावाची श्रीमंती ही त्या गावातील संपत्ती वरून न ठरवता त्या गावातील एका व्यक्तीने असे काम केले असावे ज्याचे नाव लोकं वर्षानुवर्ष काढतील ते श्रीमंत गाव. अशा श्रीमंत गावातील एक गाव म्हणजे पालगड गाव. स्वतःसाठी सर्वच जगतात पण इतरांसाठी जगणारे साने गुरुजी. गुरुजींनी मराठी भाषेला शब्दांची देणगी दिली म्हणून गुरुजी थोर साहित्यिक आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा.लिनाताई खोचरे यांनी थोरामोठ्यांचे विचार,आचार आंगीकारून त्याप्रमाणे समाजामध्ये वावरायचे आहे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. मंजिरी शितुत यांच्या मधुर आवाजात “बलसागर भारत होवो” या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. दत्तप्रसाद गुरव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर जयवंत पाटील यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गोड गोष्टी सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. शाळा व संस्थेच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.