पंढरपूर : पंढरपुरातील नदीकाठावरील (Pandharpur Temple) घाटांवर कधीही फेरफटका मारला तरी पांडुरंगाच्या मंदिरापासून पुंडलिक घाटापर्यंत अनेक भिकारी (Beggar in Pandharpur) भीक मागताना दिसून येतात. आपण कधीही फेरफटका मारला तरीही लोक त्या ठिकाणी बसून भीक मागत असताना दिसून येतात. यामध्ये अनेकजण अंध, अपंग, दिव्यांग आहेत. मात्र, पंढरीनगरीत भरणाऱ्या चारही यात्रांच्या कालावधीत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.
सध्या सुरू असलेल्या आषाढी वारीच्या यात्रेतही या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, या घाटावर शेकडो भिकारी धडधाकट असूनही भीत मागत बसलेले दिसून येत आहे. यामुळे खरे वंचित असणारे लुळे, पांगळे, अंध, अपंग या व्यक्तींना मदतीची गरज असणारे अनेकजण मात्र यामुळे मदतीपासून वंचित राहत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शरीराने धडधाकट असूनही कष्ट न करता भीक मागणे हा व्यवसाय बनतोय की काय अशी भीती या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपुरातील घाटावर अंध, अपंग लोक भीक मागून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. शारीरिक व्याधी व कष्ट करण्याची क्षमता नसल्याने त्यांना नाईलाजाने भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. मात्र, वारी कालावधीत भीक मागणाऱ्यांच्या संख्येमध्ये रातोरात अचानक होणारी वाढ चिंताजनक आहे.
या यात्रा कालावधीमध्ये रातोरात भिकाऱ्यांच्या शेकडोंनी वाढ होत आहे. ज्या दिव्यांगांना खरंच मदतीची गरज आहे, असे दिव्यांग मात्र मदतीपासून वंचित राहत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपेक्षितांना न्याय मिळणार की भीक मागणे हा व्यवसाय बनून जाणार ते पाहावे लागणार आहे.