
पुणे– रणरणतं उन, लांबलेला पाऊस (Rain) आणि पाण्याचा (Water) अभाव अशा तिहेरी संकटांचा सामना सध्या राज्यातील शेतकरी करतो आहे. यामुळेच राज्यातस्या फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या (Vegetables ) उत्पादनावर मोठा परिणाम येत्या काही महिन्यांत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. रणरणतं ऊन आणि पाऊस नसल्यानं अनेक शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची लागवडच केलेली नाहीये. खरिपाच्या लागवडीतील 20 टक्के लागवडही झाली नसल्यानं त्याचा परिणाम येत्या काही काळात पाहयला मिळण्याची शक्यता आहे. आधीच भाज्यांचे दर कडाडले आहेत, ते जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर जातील, अशी शक्यता आता वर्तवण्यात येतेय.
अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवडच केली नाही
राज्यात 11 लाख 52 हजार हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात येते. खरिपात म्हणजे जूनमध्येही ही लागवड 50 टक्के तर रब्बी हंगामात ती 30 टक्के असते तर उन्हाळअयात या लागवडीचं प्रमाण 20 टक्के असतं. मोसमी पाऊस लांबल्यानं आणि सिंचनाचे क्षेत्र कोरडे पडल्यानं यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड न करण्याचा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगतायेत. काही शेतकरी ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी लागवड केली असली तरी उष्णतेमुळं रोपं जळून जातायेत किंवा पिवळी तरी पडतायेत. त्यामुळं पाऊस सुरु झाल्याशिवाय आणि उष्णता कमी झाल्याशिवाय कोणताही शेतकरी आता भाजीपाला घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं सांगंण्यात येतय. प. महाराष्ट्रातील नर्सरींमध्ये अनेक रोपं अद्यापही पडून आहेत. शेतकऱ्यांनी एडव्हानमध्ये बुकिंग करुनही ती रोपं नेण्याची त्यांची तयारी दिसत नाहीये.
कोथिंबीर 150 रुपये जुडी, टॉमेटो 70 रुपयांवर
पाऊस नसल्यानं शेतकरी हवालदिल आहे तर बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढतेय. अशी स्थितीत भाज्यांचे भाव गगनाला पोहचले आहेत. चांगली कोथिंबीरीची जुडी 150 रुपयांनी विकली जाते आहे. तर टॉमेटोचे भावही कडाडले आहेत. ते 60 ते 70 रुपये किलोंवर जाऊन पोहचलेले आहेत. प्रत्येक भाजीपाल्यात प्रतिकिलो बाजार समितीत 20 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं सांगण्यात येतंय. तर किरकोळ बाजारात ही वाढ प्रतिकिलो 30 रुपयांपर्यंत आहे. काही महिन्यांपूर्वी टॉमेटोला कवडीमोल भाव मिळत होता, आता तेच टॉमेटो 60,70 रुपये किलोंनी विकले जात आहेत. भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर झाल्याचं सांगण्यात येतंय. पुढच्या महिना-दोन महिन्यात हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.