
KDMC Mayoral Election :
KDMC Mayoral Election : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकेने या पदांच्या निवडणूक कार्यक्रमाची जाहिरात प्रसिद्ध केली असून, यातून हा सत्तेचा फॉर्म्युला समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ५३, तर भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, मनसेच्या ५ नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. तसेच ४ अपक्ष आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या ३ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचे संख्याबळ ६५ पर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी मंगळवार, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका सचिव कार्यालयाने यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी केली असून निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. ही विशेष सभा कल्याण (पश्चिम) येथील शंकरराव चौक स्थित महापालिका भवनातील ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहात’ दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल (पीठासीन अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडेल.
महानगरपालिकेत शिवसेना ५३ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
शिवसेनेला मनसे (५), अपक्ष (४) आणि काँग्रेस-राष्ट्रवादी (३) अशा एकूण १२ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने पक्षाची ताकद ६५ पर्यंत पोहोचली आहे.
भाजपचे ५० नगरसेवक निवडून आले आहेत.
सत्तेच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार, पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा, तर पुढील अडीच वर्षे भाजपचा महापौर बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेला कोणती पदे मिळतात आणि प्रत्यक्ष मतदानावेळी काय घडामोडी होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम महापालिका सचिव कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला आहे. २९ जानेवारीपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असून ३ फेब्रुवारीला नव्या महापौरांची घोषणा केली जाईल.
उमेदवारी अर्ज दाखल करणे: २९ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ (सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० पर्यंत).
अर्जांची छाननी व माघार: ३ फेब्रुवारी रोजी विशेष सभा सुरू झाल्यानंतर अर्जांची छाननी होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल.
मतदान पद्धत: उमेदवारांची नावे घोषित केल्यानंतर ‘हात उंचावून’ (Open Voting) मते मोजली जातील.
निवड प्रक्रिया: प्रारंभी महापौर पदाची निवड होईल आणि त्यानंतर त्याच पद्धतीने उपमहापौर पदासाठीची प्रक्रिया राबवली जाईल.
पीठासीन अधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असून, निकाल तातडीने जाहीर केला जाणार आहे.