
लोणंद : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता, आरोग्य जनजागृती, महिला प्रबोधन, मुलगी वाचवा अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन आदी महत्त्वपूर्ण उपक्रम कोरेगाव गावात राबवून गावाच्या विकासाला चालना देण्याचे काम एनएसएस विभागाने केले आहे, अशी शिबिरे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच उपयुक्त ठरतात, असे लोणंद नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सचिन शेळके यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या लोणंद ता. खंडाळा येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून कोरेगाव (ता. फलटण) येथे सात दिवस घेण्यात आलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचा समारोप झाला. त्यावेळी सचिन शेळके बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप होते. यावेळी कोरेगावचे माजी सरपंच सुनील शेळके, मोहन गोवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
‘आजादी का अमृत महोत्सव’ हे घोषवाक्य घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन फलटण तालुक्याचे माजी उपसभापती रेखा बाबासाहेब खरात यांचे हस्ते झाले. यावेळी बाबासाहेब खरात, मॅग्नेशिया केमिकल्स कंपनीचे संचालक संजय कुलकर्णी, भारत पालकर, अविनाश लगडे तसेच कोरेगावच्या सरपंच रेश्मा दादा गोवेकर, उपसरपंच रणजित गोवेकर, ग्रामसेवक एस. व्ही. मगर, माजी सरपंच सुनील शिंदे आदि मान्यवरांसह कोरेगाव ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी सदस्य व सार्वजनिक तरुण मंडळातील सदस्य उपस्थित होते.