BJP News: मागील आठ-दहा महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की आठ-दहा महिने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे. तथापि, या काळात, भाजपने अनेक महत्त्वाच्या निवडणुका जिंकल्या आहेत, म्हणजेच त्याचा त्यांच्या निवडणूक कामगिरीवर प्रतिकूल परिणाम झालेला दिसत नाही. याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण न झाल्याने अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता काही राज्यांमध्ये या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या पदासाठी जवळपास सहा नावे चर्चेत असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील एका नेत्याचेही नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केला जाऊ शकतो. याच आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ६ एप्रिल हा भाजपचा स्थापना दिवस आहे. त्यापूर्वी ५ एप्रिलाला नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. विविध राज्यातील संघटनात्मक नाव नोंदणी पूर्ण झाल्याने अध्यक्षांचे नाव आता जाहीर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार असल्याची चर्चा सुरू असल्याने या पदावर कुणाची वर्णी लागणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे आघाडीवर आहे. याशिवाय महाराष्ट्रातील भाजपचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले विनोद तावडे यांचेही नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीमध्ये, प्रादेशिक संतुलन, महिला नेतृत्व, दलित प्रतिनिधित्व आणि संघटन कौशल्य या निकषांना प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय येत्या काळात गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये
संघटनात्मक निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाची कमान कुणाकडे सोपवणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इंडियन नेव्ही भरती: SSR मेडिकल असिस्टंट पदासाठी करा अर्ज; येथे करा Apply
दरम्यान, रविवारी (30 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नागपूरच्या रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आहे. त्यामुळेनव्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2014 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर अमित शाह यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर 2019 मध्ये जे. पी. नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सध्या नड्डा यांचा कार्यकाळ संपला असून, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.