मुंबई : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलैपासून करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून ९ हप्ते महिलांना वितरित करण्यात आले आहेत.
मात्र, या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक तरतुदींवर मोठा ताण येत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, सरकार इतर योजनांचे निधी या योजनेत वळवत आहे. त्यामुळे या योजनेवर विविध चर्चा आणि वादंग सुरू आहेत. तरीदेखील, राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की ही योजना पुढेही चालूच राहणार आहे.
कृषीमंत्री कोकाटेंच्या वक्तव्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संतापले; राजीनाम्याची केली मागणी
या विषयावर आता मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व हप्ते लाभार्थींना मिळाले आहेत. काही हप्ते जर रखडले असतील, तर ते येत्या महिन्यात जमा केले जातील. योजनेअंतर्गत अशा महिलांनाही निधी दिला गेला आहे, ज्या पात्रतेच्या निकषात बसत नव्हत्या. त्यामुळे या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला जात आहे आणि ज्यांना अद्याप हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. एप्रिल महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता असल्याचेही मंत्री संजय सावकारे यांनी नमूद केले.
दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी असे आश्वासन दिले होते की, सत्तेत आल्यानंतर ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या दीड हजार रुपयांच्या हप्त्यात वाढ करून दर महिन्याला २१०० रुपये देण्यात येतील. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे.
PM Modi Sri Lanka Visit: श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत; मिळाला ‘हा’ सर्वोच्च सन्मान
तथापि, अद्याप या योजनेतील महिलांना वाढीव रक्कम मिळालेली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बाबत घोषणा होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अधिवेशनात यासंबंधी कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता या योजनेचा हप्ता वाढून २१०० रुपये कधीपासून मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना असून, राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा तिचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹१५०० ची थेट आर्थिक मदत त्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाते. अलीकडेच, या योजनेतील दहाव्या हप्त्याची तारीख २४ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. हप्ता दोन टप्प्यांत लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक महिलांना लवकरच या हप्त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.