PM Modi Sri Lanka Visit: श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत; मिळाला 'हा' सर्वोच्च सन्मान (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कोलंबो: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (04 एप्रिल) रोजी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर कोलंबो विमानतळावर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेराथ, आरोग्यमंत्री नलिंदा जयतिस्सा आणि इतर प्रमुख मंत्री नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते. मोदींना राजकीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधानांना स्वातंत्र्य चौकात गार्ड ऑफ ऑनर आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
पंतप्रधान मोदींचा हा चौथा श्रीलंका दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांना श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने श्रीलंका मित्र विभूषण ने सन्मानित करण्यात आले. श्रीलंकेचा हा पुरस्कार श्रीलंकेसोबत विशेष मैत्री आणि सहकार्य जोपासणाऱ्या विशेष व्यक्तींना देण्यात येतो. हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी “हा केवळ माझा सन्मान नाही तर 140 कोटी भारतीय नागरिकांचा आहे,” असे म्हटले. त्यांनी असेही म्हटले की, हा पुरस्कार भारत आणि श्रीलंकामधील घट्ट मैत्रीचे आणि सामायिक मूल्यांचे प्रतीक आहे. भारत फक्त शेजारी देश नाही, तर खरा मित्र आहे.
#WATCH | Colombo | Prime Minister Narendra Modi says, “…Today, to be honoured with the Sri Lanka Mitra Vibhushan award by President Anura Kumara Dissanayake—it’s not an honour to me but to 140 crore Indians. It shows the historical relation and deep friendship between the… https://t.co/YQzcwp16n0 pic.twitter.com/wCzYZUin8b
— ANI (@ANI) April 5, 2025
या दौऱ्यादरम्यान भारत-श्रीलंका संबंधांना मोदींनी अधोरेखित केले. त्यांनी आर्थिक आणि विकासात्मक संबंधांच्या महत्वावर भाष्य केले. त्यांनी अनेक महत्वाच्या विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. श्रीलंकेमधील भारतीय वंशाच्या (IOT) समुदायासाठी 10 हजार कोटींची गृहनिर्माण आणि सामाजिक विकास योजना जाहीर केला आहे. तसेच पायाभूत सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हीटी आणि हरित उर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठीही दोन्ही देशांत नवीन करार करण्यात आले आहेत. श्रीलंकेतील शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहे.
यादरम्यान नरेंद्र मोदींनी भारतीय मच्छिमारांच्या अटेकवर चर्चा केली. त्यांनी म्हटले की, मच्छिमारांचा पोटा-पाण्याचा प्रशन आहे. आम्ही मच्छिमारांना आणि त्यांच्या बोटी सोडण्याचे आवाहन करतो. या घटनेकडे मानवतेच्या दृष्टीने पहावे असे त्यांनी म्हटले. दोन्ही देशांतील मच्छिमारांचा प्रश्न एक संवेदनशील आणि दीर्घकाळापासून सुरु असलेला वाद आहे. हा वाद प्रामुख्याने मासेमारी हक्क आणि सागरी सीमांच्या उल्लंघनाशी संबंधित आहे.
तामिनाडू आणि श्रीलंकेतील मच्छिमार पाल्क सामुद्रधुनी आणि मन्नारच्या आखातात मासेमारी करतात. जैवविविधतेने समृद्ध परिसरात दोन्ही देशांसाठी सागरी सीमा निश्चित आहेत. यांचे उल्लंघन आंतरराष्ट्रीय गुन्हा मानला जातो. अनेक वेळा तामिळनाडू मच्छीमार मासे पकडण्यासाठी श्रीलंकेच्या भागात प्रवेश करतात. यामुळे अनेकदा सीमांचे उल्लंघन होते. हा वाद सतत वाढत असून पंतप्रधान मोदींनी याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहण्याचे आवाहन केले आहे.
सध्या श्रीलंका आर्थिक संकटाचा समना करत आहे. भारताने श्रीलंकेला 4.5 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. या दौऱ्यात मोदींनी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके 06 एप्रिल रोजी अनुराधापुरा येथे महाबोधी मंदिरात पूजा करणार आहेत. तसेच भारताच्या सहकार्याने दोन विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.