सोलापूर : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी जिल्हा आणि शहरी लेखा व्यवस्थापकांच्या राज्यभरातून २३ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार यांनी आदेश दिले आहेत. सोलापूर महानगरपालिकेसाठी शहर लेखा व्यवस्थापकपदासाठी विजय भानुदास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या बऱ्याच योजना राबविल्या जातात. त्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय शहरी व ग्रामीण आरोग्य विभाग कार्यरत केला आहे. या विभागाला केंद्र शासनाचा मोठा निधी मिळतो यातून ग्रामीण व शहरी भागात गरिबांसाठी आरोग्य केंद्रे, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे. हे अभियान चालवण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य योजनेतून कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करण्यात आली आहे.
या अभियानात कार्यरत असलेले कंत्राटी डॉक्टर, आरोग्यसेवक, नर्स, तंत्रज्ञ व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा पगार, आशा वर्करचे मानधन, खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी जिल्हा लेखा व्यवस्थापक व कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यक्रम व्यवस्थापक अशा पदांची नियुक्ती केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात अशा महत्त्वाच्या पदावर असलेली माणसे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत आहेत. त्यामुळे कामाच्या अनुषंगाने या पदांबाबत तक्रारी वाढल्या आहेत. या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तिबाबत वाद निर्माण होऊ नये म्हणून राज्यशासनाने डीपीएम व डॅम अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्यात आली आहे.
वादग्रस्त कर्मचाऱ्यांचे काय?
आर्थिक बाबींशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट कालमर्यादेत नंतर बदल्या करण्यात याव्यात. हा प्रस्ताव चांगला असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगितले जात आहे. या अभियानात वादग्रस्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.