यवत : पारगावात मध्यरात्री दोन चोर घरात चोरी करत असताना दोघा भावांनी धाडसाने दोन्ही चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना (Pargaon Incident) येथे घडली. पण चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सौरभ चंद्रकांत शेलार हा तरुण जखमी झाला. या तरुणांच्या धाडसी कामगिरीचे पारगाव परिसरात कौतुक होत आहे.
हनुमंत लतीब भोसले (वय ३५, रा. इंदापूर), श्याम प्रकाश चव्हाण (वय ३८, रा. श्रीगोंदा) अशी अटक चोरट्यांची नावे आहेत. याबाबत यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेली माहिती अशी, ३० जून रोजी मध्यरात्री जबरी चोरीच्या उद्देशाने दोन चोरटे पारगाव येथील रेणुका नगरमध्ये चंद्रकांत शेलार यांच्या घरात घुसले. त्यांनी घरात उचकापाचक सुरु केली. त्यांच्या कुजबूजीने सौरभ जागा झाला. त्याला पाहून चोर पळून जाऊ लागले.
सौरभने पाठलाग करून एक चोर पकडला. त्यावर त्या चोरट्याने सौरभवर हत्याराने वार केले. एवढ्यात दुसरा चोर येऊन तोही सौरभला मारहाण करू लागला. सौरभचा आवाज ऐकून त्याचा भाऊ अमोल याने तेथे धाव घेत दुसऱ्या चोरास पकडले. या दोन्ही धाडसी तरुणांनी दोन्ही चोर पकडून यवत पोलिसांच्या ताब्यात दिले.
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
हे दोन्ही चोरटे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक नारायण पवार, फौजदार एस. एस. लोखंडे, पोलीस कर्मचारी विकास कापरे, वैभव भापकर, दामोदर होळकर यांनी भाग घेतला.