देवगड : कोकणातील बेकार पदवीधर अद्याप उपेक्षितच आहेत. या बेकार पदवीधर तरुण तरुणींना वयोमर्यादा ओलांडल्यानंतर बेकार भत्ता आणि एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. ही नागपूर येथील अधिवेशन काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे दयानंद मांगले यांनी केली होती. त्या निमित्ताने अद्यापही ठोस कार्यवाही झालेली दिसून येत नाही. या पत्राच्या अनुषंगाने कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी कोकणातील बेकार पदवीधर तरुण तरूणी पदवीधरांना योग्य तो न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावेत अशी मागणी श्री मागले यांनी केली आहे.
[read_also content=”घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी आमदार दरेकरांची मागणी https://www.navarashtra.com/maharashtra/demand-of-mla-darekar-in-ghatkopar-accident-case-533720.html”]
कोकणात पदवी प्राप्त करून अथवा पदवी शिक्षण घेऊन हजारो तरूण, तरुणी आजही बेकारीच्या खाईत लोटल्या गेले आहेत. त्यांना त्यांच्या पदवी शिक्षणाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी अथवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. प्रसंगी कोकणातील बेकार तरुण-तरुणी आपल्या घराकरिता स्वकर्तृत्वावर एखादा छोटा व्यवसाय अथवा रोजंदारीच्या कामप्रसंगी खाजगी ठिकाणी छोटी मोठी कामे, मजूर बांधकाम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या बेकार तरुण-तरुणींना कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा निमशासकीय सेवेची संधी गेल्या कित्येक वर्षात उपलब्ध झालेली नाही. त्यांनी आपली वयाची ४५ वर्षे पूर्ण करूनही त्यांना या शासकीय अथवा निमशासकीय सेवेचा लाभ मिळाला नाही.
पदवी प्राप्त करून २५ वर्षे उलटून देखील हे सर्व जण अजूनही बेकारीचे जीवन जगत आहेत. त्यांना न्याय देण्याकरता आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न शासन स्तरावर झाले नाहीत. आज जेष्ठ नागरिक अमृत महोत्सवी नागरिक यांना राज्य परिवहन महामंडळ प्रवास भांड्यात १०० टक्के मोफत प्रवास जेष्ठ नागरिक ५० टक्के सवलत अशा प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. महिलांना प्रवास भांड्यात ५० टक्के सवलत दिली जात आहे, परंतु बेकारीच्या खाईत लोटलेल्या पदवीधर तरुणांना अजूनही कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जात नाही. त्यांची वयोमर्यादा उलटूनही ते अद्यापही समस्याग्रस्त असून या वयाची ४५ वर्षे उलट उलटून गेलेल्या पदवीधर तरुण, तरुणींना मासिक रुपये ५०००/- बेकार भत्ता त्याशिवाय आणि राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी दयानंद मांगले यांनी करून याकडे शासनाने गांभीर्याने पाहावे असे सांगितले आहे.
[read_also content=”कल्याण मेट्रो मॉल येथे स्वीप टीमने केली मतदान जनजागृती https://www.navarashtra.com/maharashtra/sweep-team-conducted-voting-awareness-at-kalyan-metro-mall-533745.html”]
पुढे ते म्हणाले की, होऊ घातलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवार पुढे येत आहेत. परंतु यापूर्वी निवडून गेलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदारांनी कोकणातील बेकार पदवीधर यांच्या समस्या सोडविण्याकरता कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या नसून तसे प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. प्रसंगी लेखी दिलेल्या निवेदनाला साधे लेखी उत्तर अथवा प्रतिसाद देण्याचे त्यांनी प्रयत्न केले नाही असे नाइलाजास्तव म्हणावे. लागते निव्वळ नोकरीनिमित्त असलेल्या पदवीधर मतदारांच्या मतावर निवडून येण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या या उमेदवारांनी बेकार पदवीधर मतदारांच्या मतांचा जोगवा मागत असताना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील विशेष प्रयत्न करावेत असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.