केंद्राकडून कांदा खरेदीला सुरुवात; आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही करणार खरेदी : केंद्रीय मंत्री पियूष गोयल
Piyush Goyal : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत महाराष्ट्रातील दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटल दराने मिळणार आहे. दरम्यान, या कांदा खरेदीला आजपासूनच सुरुवात होणार आहे. आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Minister Piyush Goyal) यांनी व्यक्त केलं.
मुंबई : अहमदनगर, नाशिक, लासलगाव केंद्रावरून कांद्याची खरेदी होणार आहे. महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत राज्यातील दोन लाख मेट्रिक टन कांदा 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.
खरेदीची सुरुवात आज 12 वाजल्यापासून सुरू
महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरुन हा कांदा खरेदी करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदीची सुरुवात आज 12 वाजल्यापासून सुरू करण्यात येत असल्याचे गोयल म्हणाले.
कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क
कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. या निर्णयानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानंतर आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यानंतर दोन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे.
आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही पियूष गोयल यांना फोन आले. त्यांनी देखील राज्यातील कांदा नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केला जावा, याबाबत आग्रही विनंती केली, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.
सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी : धनंजय मुंडे
दरम्यान केंद्र व राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी देखील नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील तीन लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारने खरेदी केलेला आहे. त्याचबरोबर आता आणखी दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्यात येत असून कांद्याचे भाव उत्पादक व खरेदीदार या दोघांच्या दृष्टीने संतुलित राहतील, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील तसेच कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असेही यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले.
निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करण्याची मागणी
केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्यातील कांदा खरेदी करण्याबाबत घोषणा केली. तसेच 2 हजार 410 रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊन कांदा खरेदीस तात्काळ सुरुवात देखील केली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील दूरध्वनीवरून सातत्याने माझ्या आणि गोयल साहेबांच्या संपर्कात होते. तसेच कांदा खरेदीबाबत आग्रही होते असे मुंडे म्हणाले. केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती देखील आम्ही केली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तात्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
Web Title: Union minister piyush goyal said center will start buying onions if required will buy more onions nryb