फोटो सौजन्य - Social Media
दिवा जंक्शनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत जलद लोकल सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी दिवा शहरातील नागरिक आक्रमक झाले असून, मंगळवारी रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील वीस दिवसांपासून समाजसेविका अश्विनी अमोल केंद्रे यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आता आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे.
दिवा हे मध्य रेल्वेवरील महत्वाचे जंक्शन असून, येथे अनेक गाड्या फक्त मार्गक्रमण करतात. त्यामुळे येथील नागरिकांना दररोज प्रवासासाठी मुंब्रा, कल्याण किंवा ठाणे गाठावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून अनेक वेळा निवेदने देण्यात आली, स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात आल्या, मोर्चे काढले गेले आणि आता आमरण उपोषण सुरु आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर शनिवारी दिव्यात जोरदार एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकृतीचे पुतळे बनवून पायदळी तुडवण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी पक्षाने पाठिंबा दिला असून, पक्षाचे कार्यकर्ते विकास इंगळे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
अमोल धनराज केंद्रे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत, पण जर रेल्वे प्रशासनाने मंगळवारपर्यंत योग्य निर्णय घेतला नाही, तर आम्हाला रेल्वे मार्गावर उतरावे लागेल. रेल रोको आंदोलन होईल यास रेल्वे प्रशासन जबाबदार असेल.”
दिवा शहराची लोकसंख्या आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता, जलद लोकल सेवा सुरू होणे ही वेळेची गरज आहे. प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक उग्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी दिवा रेल्वे स्थानकावर काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.