'...तर पुणेकरांचा नळजोडच बंद करणार'; पुणे महापालिकेचा इशारा
पुणे : पाण्याचे मीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यांचा नळजोडच बंद करणार असल्याचा इशारा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिला आहे. अॅटोमॅटीक मीटर रिडर (एएआर) बसवण्यास नागरिकांकडून विरोध वाढू लागल्याने महापालिकेने ही भूमिका घेतली आहे. शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. त्याअंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच नळजोडला एएमआर पाण्याचे मीटर बसण्याचे काम सुरु आहे. मात्र, हे मीटर बसवण्यास नागरिकांकडून तसेच सोसायट्यांकडून विरोध केला जात आहे.
मीटर बसविण्यात येत नसल्याने पाणी गळती शोधणे कठीण असून, मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे एएमआर पाणी मीटर बसविण्यास विरोध केल्यास थेट नळजोड बंद करण्यात येणार असल्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे. हा इशारा देणारे पत्र पाणीपुरवठा विभागाकडून देण्यास सुरुवात केली आहे. पाणी पुरवठा यंत्रणेतील गळती शोधणे, पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजनेनुसार मीटर बसविण्याच्या कामाला गती देण्यात येणार आहे.
आतापर्यंत १ लाख ८० हजार मीटर बसलविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी मीटर बसविण्यात आले आहेत, त्या भागातील पाणी गळती शोधण्यास तसेच पाण्याचा अधिक वापर केल्याचे समोर येत आहे. यामुळे पाणी वापरावर तसेच गळतीवर नियंत्रण आणणे विभागाला शक्य होत आहे. यामुळेच ज्या भागात आता मीटर बसविण्यास विरोध केला जाईल, त्यांचे थेट नळजोड बंद करण्याची कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
मीटरच्या खर्चास पालिकेची मान्यता
पालिका हद्दीतील सर्व ग्राहकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्यास्तव प्रथम वेळी बसविण्यात येणाऱ्या मीटरचा खर्च पालिकेमार्फत करण्यास पालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली आहे. त्यानुसार, पालिकेमार्फत नवीन एएमआर पद्धतीचे स्मार्ट पाण्याचे मीटर्स बनविण्यात येत आहेत. सदरच्या मीटरचा खर्च हा पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. मीटर हा आपल्या मिळकतीमध्ये आपल्या सुचनेनुसार, योग्य ठिकाणी बसविण्यात येणार आहे. मीटर सुस्थितीमध्ये व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असून, मीटरला कोणत्याही प्रकारची इजा झाल्यामुळे तुटल्यास, नादुरुस्त झाल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित ग्राहकावर असणार आहे.
नवीन मीटर बसवण्यास नागरिकांचे सहकार्य नाहीच
समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत सध्या प्राधान्याने अस्तित्वातील नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी नागरिकांकडून आवश्यक सहकार्य करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मिळकतीमधील नळजोडास एएमआर मीटर बसविण्यासाठी विरोध होत असल्यामुळे अद्याप मीटर बसविण्यात आल्यामुळे साठवण टाकीवरून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याचे मोजमाप करणे व गळती शोधणे अडचणीचे होत आहे.
पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक
पाण्याची गळती कमी करून नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याचे मोजमाप करणे आवश्यक आहे. त्यासाठी नळजोडास तातडीने एएमआर मीटर बसविणे जरुरीचे आहे. मिळकतीमधील नळजोडावर एएमआर मीटर बसविण्यासाठी सहकार्य करण्यात यावे. अन्यथा यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता नाईलाजास्तव आपला नळजोड बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल व त्याबाबत सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे नागरिकांना तसेच सोसायट्यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.