विनोद तावडेंच्या 'त्या' डायरीत नेमकं काय-काय सापडलं? कोणाची नावं होती? वाचा सविस्तर
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या काही तासात मतदानाला सुरुवात होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी मुंबईतील विरारमधील एका हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे एका हॉटेलमध्ये पैसे वाटत असल्याचा तो आरोप होता. बहुजन विकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. राज्यातच नाही तर देशातही हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान त्या हॉटेलमध्ये घडलेल्या या राड्यादरम्यान एक डायरी दिसत आहे. त्या डायरीत नेमकं काय आहे, पाहूया…
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर अनेक डायऱ्या मिळाल्यात. या डायऱ्यांमध्ये व्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे.
हॉटेलमध्ये डायरी सापडली आहे. या डायरीत १५ ते २० महिलांची नावे असून कोणतातही हिशोब लिहिल्याचं दिसत आहे. नावांसमोर २०००, ३००० असे आकडे लिहिलेले आहेत. क्षितिज ठाकूर यांनी दावा केला की, तावडे यांच्याकडे ५ कोटी रुपये आणि नावे असलेल्या दोन डायऱ्याही सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.
विनोद तावडे म्हणाले…
विरारमधून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय असतात, ते सांगण्यासाठी आलो होतो. आमच्या समोरच्या मित्र पक्षाला वाटलं की, मी पैसे वाटायला आलो आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कट रचला असल्याचा आरोप विनोद तावडेंनी केला आहे. हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांच्यासोबतही चर्चा झाली. त्यामुळे पैसे वाटप होत असेल, तर पोलीस, निवडणूक आयोग, सीसीटीव्ही फुटेज सर्व आहेत, त्याची तपासणी करा. त्यात काही आढळलं तर कारवाईला समोरे जायला तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विनोद तावडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही टीका केली आहे. हा तर महायुतीचा नोट जिहाद आहे. मी आज तुळजापूरला दर्शनासाठी गेलेलो माझी पण बॅग आज तपासण्यात आली. काल नाशिक आज विनोद तावडे यांच्याकडे पैसे सापडले अशा बातम्या येत आहेत. अनिल देशमुखांवर जो दगड मारला तो कोणी शोधायचा? निवडणूक आयोगाने!’ ‘माझ्याकडे कुठला पुरावा नाही. पण ज्या बातम्या येत आहेत, त्यानुसार तो “वोट जिहाद” असल्याचा आरोप करत निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.