यवत : केडगाव (ता.दौंड) येथील नागेशवर व पीर साहेबांच्या यात्रेनिमित्त परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावरून केडगाव परिसरामध्ये जातीय सलोखा जोपासल्याचे पाहायला मिळाले. तसेच नागेश्वर यात्रेनिमित्त कुस्त्यांचा थरार ग्रामस्थांनी अनुभवला.
यात्रेनिमित्त शंभू महादेव मंदिर आणि पीर साहेबांचा दर्गा आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला. आखाड्याची सुरुवात केडगावचे माजी उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली.
आखाड्यासाठी बाहेरगावाहून पैलवान आले होते. त्यात महिला कुस्तीगिरांचाही समावेश होता. अंतिम कुस्ती आंधळगावचा पै. अक्षय पांढरे व पिंपळगावचा पै. सुजित इनामके यांच्यामध्ये झाली. ही कुस्ती बरोबरीत सुटल्याने दोघांनाही २० हजार रुपयांचे इनाम देण्यात आले.
यावेळी यात्रा कमिटीचे प्रमुख चंद्रकांत पाटील, आप्पासाहेब हंडाळ, मल्हारी हंडाळ, विष्णु हंडाळ, माजी उपसरपंच अशोक हंडाळ, सतीश बारवकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप, दादा बारवकर, गोविंद गायकवाड, संपत हंडाळ, सुभाष शेळके, अतुल शेळके आदी उपस्थित होते.