File Photo : Solapur ZP
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला लागलेले ग्रहण अखेर मंगळवारी सुटले आहे. सुनील खमितकर यांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून पदभार घेतला आहे. गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग वादातीत ठरला होता. यापूर्वीचे समाजकल्याण अधिकारी जाधव यांनी पुण्याला विनंती बदली मागितली होती. त्यांची बदली मान्य झाल्यावर खमितकर यांची नियुक्ती झाली होती. पण त्यांना पदभार देण्यात आला नव्हता. त्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला.
समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत साहित्य वाटपात वशीलेबाजी केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजीव खिलारे यांनी केली होती. या तक्रारीवर समाजकल्याण विभागाच्या उप आयुक्त मनीषा फुले यांनी तीन दिवस जिल्हा परिषदेत ठाण मांडून चौकशी केली होती.
तसेच दलितवस्ती विकास निधी वाटपावरून जिल्हा परिषद सभा व जिल्हा नियोजन सभेत लक्षवेधी झाली होती. टक्केवारीवरून कामाचे वाटप झाल्याचा आरोप झाला होता. तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव सांगा त्या अधिकार्याला निलंबित करतो अशी घोषणा केली होती. आमदार राम सातपुते यांनी तर राजीनामा देण्याची मागणी केली होती. पण नाव उघड झाल्यानंतर संबंधीत टेबलाच्या लिपिकाची बदली करण्यात आली व समाजकल्याणचा पदभार काढण्याबाबत सीईओ दिलीप स्वामी यांनी शासनाकडे अहवाल सादर केल्याचे सांगितलेे जात होते.
त्यामुळे प्रकरण गंभीर झाले होते. राज्यात सत्ता बदलानंतर या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे खमितकर यांनी पूर्वी या पदावर काम केले आहे. त्यांची यापूर्वीची कारकीर्द बरीच गाजली होती.
ग्रहणादिवशीच घेतला पदभार…
झेडपीच्या समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी म्हणून सुनील खमितकर यांनी मंगळवारी पदभार घेतला. आज ग्रहण आहे म्हणून झेडपीतील बरेच अधिकारी व कर्मचार्यांनी दांडी मारल्याचे चित्र दिसून आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे काही काळासाठी कार्यालयात आले होते. त्याकाळात खमितकर यांनी पदभार घेतल्याचे सांगण्यात आले. पण समाजकल्याण अधिकारी कार्यालयातील केबीन बंदच दिसत होती. समाजकल्याणला नवीन अधिकारी मिळाल्याने समाजकल्याण विभागाचे ग्रहण सुटले अशी कर्मचार्यांत चर्चा दिसून आली.






