खास कौटुंबिक कथा आणि भावनिक नातेसंबंधांची सुंदर गुंफण मांडणारा “अशी ही जमवा जमवी” हा मराठी चित्रपट अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण आणि हृदयाला भिडणारी कथा, सहज संवाद आणि अभिनयाची दिलखुलास शैली यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
नुकतंच या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. या खास प्रसंगी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आणि मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. या स्टार-स्टडेड संध्याकाळी उपस्थित राहणाऱ्यांमध्ये राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार आशिष शेलार यांचाही समावेश होता. त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आणि या अनुभवावर आपल्या मनोगतांतून प्रकाश टाकला.
या स्क्रीनिंगमध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि मुंबई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, सुप्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर, बहुआयामी कलाकार सचिन पिळगांवकर, भरत जाधव, सुनील बर्वे, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, संगीतकार अमितराज, चैत्राली गुप्ते आणि अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण संध्याकाळ उत्साहपूर्ण आणि जल्लोषमय झाली होती. चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध बॅनर राजकमल एंटरटेनमेंटच्या अंतर्गत करण्यात आली असून, व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांनी याच्या माध्यमातून पहिल्यांदाच निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. दिग्दर्शनाची धुरा लोकेश गुप्ते यांनी सांभाळली असून त्यांनी कौटुंबिक मूल्ये, नातेसंबंध आणि विनोद यांचा सुरेख मेळ घालून एक प्रभावी सिनेमाटिक अनुभव साकारला आहे.
“अशी ही जमवा जमवी” हा चित्रपट केवळ मनोरंजन देणारा नसून आजच्या काळातील कौटुंबिक गुंतागुंतीवर प्रकाश टाकणारा आणि नात्यांची जपणूक कशी करावी हे शिकवणारा आहे. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडले गेले आहेत. एकूणच, या चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक सकारात्मक हवा निर्माण केली असून, त्याच्या यशाबद्दल टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.