(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा भव्य चित्रपट ‘कांतारा चॅप्टर 1’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. पौराणिक कथांचा आणि आदिवासी संस्कृतीचा संगम असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करत असून, प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने जगभरातून ५०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.२०२२ साली प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ हा चित्रपट केवळ कन्नडच नाही, तर संपूर्ण भारतभरात सुपरहिट ठरला. त्या यशानंतर प्रेक्षक ‘कांतारा: चॅप्टर १’ या प्रीक्वलसाठी प्रचंड उत्सुक होते. आणि अखेर तो प्रदर्शित होताच, बॉक्स ऑफिसवर धमाका झाला.
प्रेक्षकांचा प्रतिसाद, समीक्षकांचं कौतुक, आणि जगभरातल्या कमाईचे आकडे यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला.सगळीकडे कौतुक होत असताना आता चित्रपटातील एक मोठी चूक प्रेक्षकांच्या नजरेस पडली आहे. ही चूक कळताच तुम्ही डोक्याला हात लावाल. एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी गफलत कशी झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.सोशल मीडियावर प्रेक्षकांनी एका सीनमधील चूक दाखवून तिचा स्क्रीनशॉट व्हायरल केला आहे. ही चूक इतकी बारीक आहे की सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण प्रेक्षक काहीही सोडत नाहीत!
मंदिराजवळ पाण्याची बाटली ?
चित्रपटातील ‘ब्रह्मकलश’ या गाण्यात गावकरी केळ्याच्या पानांवर बसून जेवत असल्याचं दृश्य दाखवलं आहे. पार्श्वभूमी उत्सवमय आहे, वाद्यांची गजर, पारंपरिक पोशाख… पण या सीनमधल्या एका कोपऱ्यात एक प्लास्टिकची पाण्याची बाटली स्पष्टपणे दिसून येते!आता इथेच खरी अडचण आहे. कारण ‘कांतारा चॅप्टर १’ची कथा चौथ्या शतकातील आहे, आणि आपल्याला माहीत आहे की प्लास्टिकचा शोध २०व्या शतकात लागला. त्यामुळे त्या काळात प्लास्टिकची बाटली असणं म्हणजे स्पष्ट ऐतिहासिक चूक.ऋषभ शेट्टीने या सिनेमासाठी केलेली मेहनत, प्राचीन काळाचा अभ्यास, कलाकारांची तयारी, हे सगळं पाहता ही गफलत मोठ्या प्रमाणात आश्चर्यचकित करणारी आहे. प्रेक्षक म्हणत आहेत की, “इतक्या मोठ्या बजेटच्या, दर्जेदार सिनेमात अशी प्राथमिक पातळीची चूक होणं म्हणजे थोडं निराशाजनक आहे.”
I just learned that the Kadambas were the first to use plastic water cans #KantaraChapter1 pic.twitter.com/o8Hcam48AU — Nand@n (@nandanx333) October 11, 2025
या चुकीची तुलना थेट २०१९ मध्ये घडलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (Game of Thrones) मधील वादग्रस्त क्षणाशी केली जात आहे. त्या मालिकेच्या एका भागात, मध्ययुगीन सेटवर अचानक स्टारबक्सचा कॉफी कप दिसून आला होता. ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ‘कांतारा चॅप्टर-१’ मधील प्लास्टिकच्या बाटलीची चूक त्याच श्रेणीतील मानली जात आहे.
केतकी कुलकर्णीचा १० वर्षांचा प्रवास, ‘अस्मिता’पासून ‘कमळी’पर्यंतचा अविस्मरणीय टप्पा!