फोटो सौजन्य - Social Media
अर्थव सुदामेने गेले अनेक वर्षे मराठी जनतेला आपल्या रील्सच्या माध्यमातून हसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने मराठी भाषेसाठी तसेच संस्कृतीसाठी उत्तम असे कंटेंट दिले आहेत. पण नुकतीच त्याने ‘हिंदू-मुस्लिम एकता’ या मुद्द्यावर रील तयार केली होती. जी वादाच्या भोवऱ्यात सापडली असून त्याला ती डिलीट करावी लागली आहे. तसेच त्याबद्दल त्याने दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान, अर्थवला मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील X पोस्टच्या माध्यमातून अर्थवला पाठिंबा दिला आहे.
अशामध्ये अभिनेता अभिजीत केळकरने या मुद्द्यात उडी घेतली आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरी टाकली असून त्याच्या माध्यमातून अथर्वची पाठराखण केली आहे. या पोस्टमध्ये नमूद आहे की,” माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम… युद्धात देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, संरक्षणाची जबाबदारी सक्षमतेने पार पडणाऱ्या सोफिया कुरेशी, सनई वादक उस्ताद बिस्मिल्लाह खान, तबलानवाज उस्ताद अल्लारखा खान, झाकीर हुसेन, A R रेहमान, सानिया मिर्झा, महाराजांचं संरक्षण करणारे सैय्यद बंडा, तिन्ही खान, रफी साहेव, मुसूफ खान, मधुबाला, नर्गिस, मीना कुमारी आणि असे अनंत…
ह्यांच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, अभिमान असेल आणि त्यांच्यावर प्रेम करताना त्यांचा धर्म कुठला हा विचार आपल्या मनातही येत नसेल… मला गरज पडली तर माझ्यासाठी ज्याने रक्तदान केलं, डॉक्टर म्हणून उपचार केले, जेवताना धान्य ज्याने पिकवलं तो कुठल्या धर्माचा, जातीचा आहे हे मला विचारावंसं ही वाटत नसेल तर मग आपण जिला बुद्धीची देवता मानतो अशा गणपती बाप्पाची मूर्ती कोणी घडवली आहे. त्या माणसाची जात, धर्म कुठला आहे ह्याचा मला का फरक पडावा? मी ब्राह्मण जातीत जन्माला आलो ह्यात माझं काहीही कर्तृत्व नाही, ना माझ्या आई वडिलांनी जात पात मानण्याचे संस्कार माझ्यावर केले… सरकारी ठिकाणी, कागदपत्रांवर जात, धर्म लिहावा लागतो म्हणून नाईलाजाने मी तो लिहितो / लिहावा लागतो…
जन्माने मिळालेला माझा हिंदू धर्म, जन्माने मला मिळालेली ब्राह्मण ही माझी जात, मला कुठलाही भेदभाव किंवा द्वेष करायला शिकवत नाही… उलट माझा हिंदू धर्म मला, वसुधैव कुटुंबकम हीच शिकवण देतो… हे असं असताना जर अथर्व सुदामे हाच संदेश आपल्या व्हिडिओतून देत असेल तर तो आपल्यातल्याच काही लोकांना का खटकावा???”