अभिनेते धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने बजावले समन्स, नेमकं काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र यांना दिल्ली कोर्टाने ‘गरम धरम ढाबा’ या हॉटेलच्या फ्रेंचायझी प्रकरणी समन्स बजावले आहे. त्यांच्यासोबतच आणखी दोघांनाही कोर्चाकडून समन्स बजावण्यात आले आहे. ज्युडिशियल मजिस्ट्रेट यशदीप चहल यांनी समन्स जारी केले असून दिल्लीचे व्यापारी सुशील कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोर्टाने दखल घेतली आहे.
धर्मेंद्र यांच्यासह दोघांना कोर्टाने का समन्स बजावले ?
धर्मेंद्र यांना दिल्ली कोर्टाने ‘गरम धरम ढाबा’ या हॉटेलच्या फ्रेंचायझी प्रकरणी समन्स बजावले आहे. दिल्लीचे व्यापारी सुशील कुमार यांनी धर्मेंद्र यांच्यावर हॉटेल प्रकरणी फसवणूक केल्याने आरोप केले आहेत. हॉटेलच्या फ्रेंचायझीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये अभिनेते धर्मेंद्र आणि आणखी दोघांचा समावेश आहे. या प्रकरणातले इतर दोघं जणं कोण आहेत ? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
आयपीसी (Indian Penal Code) कलम ५०६ च्या अंतर्गत गुन्हेगारी धमकीच्या गुन्ह्यासाठी तिघांना समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी २० फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. कोर्टाने म्हटलं आहे की, न्यायालयाने या प्रकरणाची प्रथमदर्शनी तपासणी करणे आवश्यक आहे. ९ ऑक्टोबर २०२० रोजी कोर्टाने या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचे आदेश देणारी एक याचिका फेटाळली होती. कोर्टाने तक्रारदाराला पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. तक्रारदार सुशील कुमार यांच्यावतीने अधिवक्ता डीडी पांडे कोर्टात हजर राहिले होते.
Bollywood Top Movie Of 2024: ‘या’ १० बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एप्रिल २०१८ मध्ये दोन आरोपींनी दिल्लीच्या व्यापाऱ्याला धरम पाजीच्या वतीने NH-24/NH-9 उत्तर प्रदेशमध्ये ‘गरम धरम ढाब्या’ची फ्रँचायझी उघडण्याची ऑफर देत त्याच्यासोबत संपर्क केला होता. तक्रारदाराला कनॉट प्लेस, दिल्ली आणि मुर्थल, हरियाणा येथील ‘गरम धरम ढाब्या’च्या शाखांमधून तब्बल ७० ते ८० लाख रुपयांपर्यंत महिन्याला उलाढाल होत होती. आणखी एका ठिकाणी गुंतवणूक करण्याचं कारण देत दिल्लीच्या व्यापाऱ्याला हॉटेलच्या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करायचे आमिष दाखवण्यात आले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या गुंतवणुकीवर सात टक्के नफ्यावर ४१ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. शिवाय, गुंतवणुकदाराला फ्रेंचायझी सुरू करताना संपूर्ण मदत केली जाईल, असंही अश्वासन करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपी आणि तक्रारदार यांच्यात अनेक ई-मेल आणि मिटिंग्सही झाल्या होत्या. कनॉट प्लेसमध्ये गरम धरम ढाबाचे ब्राँच ऑफिमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये एक मिटिंगदेखील झाली होती.