जबरदस्त ॲक्शन अन् बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी; Baby John च्या ३ मिनिट ६ सेकंदाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
अभिनेता वरूण धवनचा (Actor Varun Dhawan) ‘बेबी जॉन’ चित्रपट (Baby John Film) येत्या २५ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा फुल्ल ऑन ॲक्शन असणारा ३ मिनिट ६ सेकंदाचा ट्रेलर काही तासांपूर्वीच ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त ॲक्शन, बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी आणि कॉमेडीची मेजवानी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट थलापती विजयच्या ‘थेरी’ चित्रपटावर आधारलेला आहे. या बहुचर्चित ट्रेलरचे प्रेक्षक जोरदार कौतुक करीत असून कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत.
‘या’ १० बॉलिवूड चित्रपटांना प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती
‘बेबी जॉन’ चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरनंतर आता ट्रेलरनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला बाप लेकीच्या सीन्सने सुरूवात होते. वरुण धवन चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. केव्हा पोलिस अधिकाऱ्याच्या, केव्हा एका वडीलाच्या, तर केव्हा एका प्रेमी युगलाच्या… तर वरुण धवनच्या विरोधात आपल्याला जॅकी श्रॉफ एका खलनायकाच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ३ मिनिट ६ सेकंदाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणून धरली आहे. प्रेम, त्याग आणि अन्यायाविरोधात लढा देणारा वरुण धवन चित्रपटात धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हा लूक प्रेक्षकांना पहिल्यांदाच दिसणार आहे.
धाडसी पोलिस अधिकारी म्हणून अभिनेता बलात्कार पीडितांना न्याय मिळवून देताना पाहायला मिळणार आहे. तो त्याच्या मुलीच्या रक्षणासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो, हे प्रेक्षकांना ट्रेलरमध्ये पाहायला मिळेल. वरुण धवन आणि जॅकी श्रॉफ यांच्यात कशा प्रकारे ॲक्शन होते, हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल. ट्रेलरच्या शेवटी सलमान खानची झलक पाहायला मिळेल. त्याचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत नाही, अभिनेत्याचा झाकलेला चेहरा असून सलमान आणि वरुण दोघंही गुंडांशी मारामारी करताना दिसत आहेत. ट्रेलरच्या शेवटी त्याच्या आवाजात ‘मेरी ख्रिसमस’ ऐकू येतंय. ॲक्शन सीन्सने, काही भावनिक सीन्सने शिवाय बॅकग्राऊंड म्युझिकनेही प्रेक्षकांच्या मनावर ठाव घेतला आहे.
या सिनेमाविषयी व्यक्त होताना वरुण धवन म्हणाला की, “’बेबी जॉन’चा मी एक भाग होता आला मला खूप आनंद आहे. हा सिनेमा खूपच भावनिक आहे आणि स्टोरीलाईन बद्दल म्हणायचं तर हा सिनेमाच खूप पॉवरफुल जर्नी आहे. यामधील पात्रं साकारण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. ट्रेलरमध्ये या कथेची तीव्रता आणि झलक पाहायला मिळते. या प्रोजेक्टवर काम करणे खरोखरच खास होते, आणि ही कथा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे.”
सिने 1 स्टुडिओचे निर्माते मुराद खेतानी म्हणाले, “बेबी जॉनच्या माध्यमातून आम्हाला असा एक सिनेमा बनवायचा होता जो ऍक्शन आणि मानवी भावना यांचा सुंदर संगम दाखवेल. बेबी जॉन आमच्या प्रेमाचा आणि मेहनतीचा परिणाम आहे. आज प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे मला खात्री आहे की हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल. आम्ही हा सिनेमा जगासमोर सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अद्वितीय टीमसोबत काम करून तयार झालेल्या या सिनेमाचा आम्हाला खूप अभिमान आहे.”
प्रेजेंटर अटली म्हणाले, “बेबी जॉन ही एक खूप महत्त्वाची आणि आजच्या काळाला साजेशी कथा मांडते. हा एक मनोरंजनपूर्ण कौटुंबिक सिनेमा आहे, पण महिलांच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयांवरही प्रकाश टाकते, जे आजच्या समाजासाठी मोठ्या चिंतेचा विषय आहे. याशिवाय, हा सिनेमा पालकत्वाच्या परिणामांवर भर देत आहे. चांगल्या आणि वाईट वडिलांमधील फरक दाखवत, चांगले पालकत्व समाजाला कसे सकारात्मक स्वरूप देऊ शकते, हे अधोरेखित करते. या अर्थपूर्ण प्रोजेक्टचा भाग होऊन मला खूप अभिमान वाटतो.”
सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान क्रेझ, युट्यूबवर टीझरचा Top 10 मध्ये समावेश
ज्येष्ठ संगीतकार ए. आर. रहमानचे संगीताने आणि त्यांच्या बॅकग्राऊंड म्युझिकने (BGM)ट्रेलरला आणखी एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जात आहे. ज्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यास अधिक उत्सुक आहेत. वरुण धवनची धमाकेदार एंट्री आणि वामिका गब्बीसोबतच्या त्याच्या अप्रतिम डान्स मूव्ह्ससह यापूर्वी रिलीज झालेल्या चार्ट-बस्टर गाण्यातील ‘नैन मटक्का’ हे देखील ट्रेलर लॉन्च इव्हेंटचे मुख्य आकर्षण होतं. ‘बेबी जॉन’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत वरुण धवन, कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव आहेत. मुराद खेतानी, प्रिया अटली आणि ज्योती देशपांडे निर्मित, ‘बेबी जॉन’ हा एक मोठा सिनेमॅटिक अनुभव आहे जो तुम्ही चुकवू शकत नाही. कॅलिस दिग्दर्शित हा चित्रपट 25 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.