“अलविदा अतुल”, अतुल परचुरेंच्या निधनानंतर किरण मानेंनी शेअर केली खास पोस्ट
सोमवारी सायंकाळी अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाचे वृत्त आले आणि सर्वच मराठी फिल्म इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला. अतुल परचुरे यांचे निधन कर्करोगामुळे वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हरहुन्नरी कलाकाराच्या निधनानंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. अशातच अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी अतुल परचुरेंविषयी आठवण सांगताना म्हणाले,
“माझी आणि अतुल परचुरेंची खूप मैत्री वगैरे नव्हती. एकमेकांची नाटके बघणे आणि प्रयोगानंतर थोडी चर्चा करणं याव्यतिरिक्त फार संबंध आला नाही. पण, दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आमचं एकमेकांशी दोन-तीन वेळा फोनवर बोलणं झालं. जे बोलणं झालं, ते खूप महत्त्वाचं होतं. गंभीर विषयांवर होतं. प्रस्थापितांशी बोलताना मी थोडा सावध असतो. माझ्याविषयी कुणाचा कुणी काय गैरसमज करून दिलेला आहे, ते माहीत नसतं. पण, अतुल पहिल्या फोनमध्येच अगदी जुनी मैत्री असल्यासारखं भरभरून बोलला. बोलण्यात आपुलकी होती. ज्या विषयांसाठी फोन झाला, त्या संदर्भात हातचं न राखता माहिती दिली. ज्या माहितीचा मला प्रचंड उपयोग झाला. ‘माणूस’ म्हणून हा लाखात एक आहे हे जाणवलं. चांगली माणसं लवकर गेली की, प्रचंड निराशा येते. खचल्यासारखं होतं. अलविदा अतुल…” असे म्हणत किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अतुल परचुरे यांनी आपल्या फिल्मी करियरमध्ये नाटक, मराठी- हिंदी टेलिव्हिजन सीरियल आणि मराठी- हिंदी चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘क्यूँ की मैं झूठ नहीं बोलता’, ‘चोर मचाये शोर’, ‘तुमसा नहीं देखा’ ‘खट्टा मिठा’सह अनेक नावाजलेल्या मराठी- हिंदी चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. शिवाय, ‘होणार सून मी या घरची’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘यम हैं हम’ आणि ‘कपिल शर्मा शो’ अशा टीव्ही मालिकांमधून आणि रिॲलिटी शोमधून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अतुल परचुरे यांना इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.