अभिनेत्री पूर्वा कौशिकसह खास बातचीत
झी मराठीवर अनेक वेगवेगळ्या मालिका येत असतात आणि त्यातील पात्रांचा पगडा प्रेक्षकांवर असतो हे मात्र नक्की. आजपासून ‘दीपज्योती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि यामधून अभिनेत्री पूर्वा कौशिक पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीसाठी सज्ज आहे. मात्र ‘शिवा’ या भूमिकेतून दिसलेली पूर्वा अगदी विरोधाभास असणाऱ्या भूमिकेत दिसणार आहे.
या मालिकेचा प्रोमो आल्यापासूनच तिच्या भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली होती आणि ही भूमिका अगदीच वेगळी असल्याचं खुद्द पूर्वानेही सांगितलं आहे. तिला ही भूमिका कशी मिळाली आणि या नव्या भूमिकेविषयी पूर्वाला नक्की काय वाटत आहे? तिने या भूमिकेसाठी कशी तयारी केली याबाबत अगदी दिलखुलासपणे ‘नवराष्ट्र’शी गप्पा मारल्या आहेत.
पुन्हा एकदा त्याच चॅनेलबरोबर काम करताना पण वेगळ्या भूमिकेत कसं वाटतंय?
असं विचारल्यावर पूर्वा म्हणाली, ‘दीपज्योतीमधील ज्योती ही खूप साधीभोळी आणि अगदी टिपिकल मुलगी आहे. पहिला मुद्दा हाच होता की, प्रेक्षक स्वीकारतील का? शिवा ही मालिका खूप चालली आणि प्रेक्षकांनी मला त्याच स्वरूपात स्वीकारलं. खरं सांगायचं तर पूर्वा म्हणूनही मी अगदी ज्योती या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे ही भूमिका साकारताना मला खूपच मजा येत आहे.’
या भूमिकेसाठी काही तयारी करावी लागली का?
यावर पूर्वाने अगदी मनमोकळेपणाने सांगितलं की, ‘हो, कारण शिवा करताना मला बिनधास्त काम करता येत होतं कारण ती भूमिका अगदी माझ्या स्वतःच्या स्वभावाशी थोडीफार निगडीत होती. पण ज्योती करताना मला सगळ्याच गोष्टीचे भान ठेवावे लागत आहे. कारण गेले १२–१३ वर्ष मी करतेय आणि नाटक करताना तारसप्तकातला स्वर लावावा लागतो. इतकंच नाही तर माझा स्वतःचा बोलताना स्वरही जरा मोठाच आहे. पण अगदी साधेपणाने बोलणारी ज्योती साकारणं हे माझ्यासाठी आव्हान होतं. ज्योती ही खूप समजूतदार, गुणी, घरगुती आणि साधी, गोड अशी मुलगी आहे. तिला नटण्याची-सजण्याची आवड आहे. ती रोज कानातले, पैंजण हे सर्वच दागिने घालते आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी काहीच करत नाही. त्यामुळे त्या भूमिकेत जगताना मला जरा आव्हानच आहे. तिच्यासारखं अगदी साधेपणाने बोलणं जरा कठीण जातंय पण मजा येत आहे.’
ही भूमिका स्वीकारताना नक्की काय विचार केलास?
यावर पूर्वाने अगदी गंभीरपणे उत्तर देत म्हटलं की, ‘‘शिवा’ नावाची भूमिका सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का? तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का? पण कामाला सुरूवात केल्यानंतर आणि झी मराठीने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासानंतर मला खात्री झाली की, प्रेक्षक मला नक्की स्वीकारतील आणि म्हणूनच मी ही भूमिका स्वीकारली. काहीतरी वेगळं करण्याची माझी इच्छा होती. कारण शिवानंतर त्याच धाटणीच्या भूमिका मला येत होत्या. अगदी यासाठी मी एक नाटकातील भूमिकाही नाकारली होती आणि त्यानंतर ही भूमिका वाट्याला आली, त्यामुळे खूप मस्त वाटतंय.’
ज्योती या भूमिकेसाठी काय अभ्यास केला आहेस?
यावर पटकन पूर्वाने सांगितले की, ‘ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खरंच खूप मेहनत घ्यावी लागत आहे. ज्योतीचं बोलणं, वागणं, तिचे हावभाव, तिचं बघणं, राग व्यक्त करण्याची पद्धत, तिचा अबोला आणि तिचा साधेपणा हे सगळं खूप सूक्ष्म आहे. या सगळ्याची तयारी करणं माझ्यासाठी सध्या तारेवरची कसरत आहे.’
प्रसाद जवादेबरोबर आणि टीमबरोबर कसा बाँड निर्माण झाला?
‘त्यासाठी मला जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत’, असं अगदी सहजपणाने पूर्वा म्हणाली, ‘प्रसादला मी आधीपासून ओळखत होते. पण काम करायला लागल्यावर पटकन बाँड झाला आणि माझ्याबरोबर काम करणारे सहकलाकार खूप मस्त आहेत, त्यामुळे अशी टीम मिळाल्याने कामही खूप मस्त होतंय’
शिवामध्ये बुलेट शिकली होतीस आणि यात रिक्षा चालवत आहेस तर काही प्रशिक्षण घेतलंस का?
यावर उत्साहाने आणि अगदी आपल्यालाही आश्चर्य वाटेल असा अनुभव पूर्वाने सांगितला, ‘जेव्हा रिक्षा चालवायचा सीन करायला सुरूवात केली मला मार्गदर्शन मिळालं आणि मी त्वरीत तसंच केलं. मी कोणतंच प्रशिक्षण घेतलं नाही आणि त्यामुळे मलाही या गोष्टीचं कौतुक आणि आश्चर्य आहे की, आपण कसं काय हे केलं? याशिवाय दिग्दर्शकांकडूनही माझं कौतुक झाल्याने तर मी अगदीच आनंदी आहे. पण इतकं कळलंय की आपल्याला गोष्टी पटकन जमतात’
याशिवाय जाताना पूर्वा म्हणाली की, ‘ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील. प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे. जसं प्रेम शिवाला दिलं तसंच दीपज्योतीमधील ज्योतीलाही मिळेल अशी नक्कीच अपेक्षा आहे”






