अनंत-राधिकाने घेतले सात फेरे; देश-विदेशातून दिग्गज मंडळींची विवाहाला उपस्थिती!
गेल्या २ वर्षांपासून चर्चेत असलेला उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाहसोहळा आज अखेर पार पडला. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथील विवाहस्थळी अनंत अंबानी आणि राधिका यांनी विवाह पारंपारिक वैदिक हिंदू रितीरिवाजांनुसार सप्तपदी घेतली. या लग्नासाठी केवळ भारतातीलच नाही तर परदेशातूनही अनेक पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
कसा होता नवरी राधिकाचा लूक?
विशेष म्हणजे मार्च महिन्यापासून अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची खूपच चर्चा रंगली होती. त्यावेळी जामनगरमध्ये पहिल्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर इटलीमध्ये दुसरे प्री-वेडिंग झाले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. लाल-गुलाबी नाही तर अनंत अंबानीची नवरी राधिका मर्चंटने लग्नासाठी ऑफ व्हाइट रंगाचा सुंदर लेहेंगा लग्नासाठी निवडला होता.
अनंत-राधिकाच्या लग्नात अख्खं बॉलिवूड अवतरलं
बॉलिवूड शेहनशहा अभिताभ बच्चन कुटुंबीयांसह लग्नाला उपस्थित होते. जुही चावला आपले पती जय मेहता व मुलाबरोबर अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित राहिली. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण पत्नी उपासनासह अनंत-राधिकाच्या लग्नाला उपस्थित होता. याशिवाय गरोदर असूनही दीपिका पदुकोण अनंत राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. तिने लग्नासाठी सुंदर लाल रंगाचा ड्रेस निवडला होता. शाहीद कपूरने पत्नी मीरा राजपूतसह हजेरी लावली. अभिनेता अजय देवगण पत्नी काजोलसह मुलगा युग सोबत लग्नाला आला होता.
याशिवाय जॅकी श्रॉफ, सलमान खान, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान आणि खुशी कपूर यांसारख्या स्टार्सनेही लग्नाला हजेरी लावली होती. संगीतकार ए आर रहमान, साऊथचा सुपरस्टार रजनीकांत, दिग्दर्शक एटली कुमार, कुटुंबासह धोनी तर भावासोबत हार्दिक पांड्या देखील उपस्थित होता.
आकाश अंबानीचा बेस्ट फ्रेंड रणबीर कपूरची पत्नी आलियासह लग्नाला उपस्थित होता. अभिनेता जॉन अब्राहम पत्नी प्रिया पांचाळसोबत पारंपरिक लूकमध्ये लग्नाला पोहोचला होता. अभिनेता सुनील शेट्टीनेही पूर्ण कुटुंबासह लग्नाला हजेरी लावली. याशिवाय अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाला देशातील दिग्गज नेते, कलाकार, खेळाडू यासह अनेक परदेशी पाहुणे यांनी देखील हजेरी लावली. सेलिब्रिटी मंडळी लग्नात डान्स करत फुल ऑन मजा घेताना दिसत आहेत.