फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडमधील चर्चेत असलेला आगामी चित्रपट ‘निशानची’ सध्या चाहत्यांच्या प्रचंड उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप यांनी केले असून, त्यांच्या अनोख्या स्टोरीटेलिंग आणि धडाकेबाज दिग्दर्शनशैलीमुळे हा चित्रपट विशेष ठरणार आहे. चेन्नईत झालेल्या प्रमोशनल टूरनंतर आता अनुराग कश्यप, ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो या तिघांनी लखनऊच्या प्रतिभा थिएटरमध्ये खास उपस्थिती लावत चित्रपटाचे पोस्टर लॉन्च केले. या प्रसंगी उपस्थित चाहत्यांचा उत्साह आणि जल्लोष पाहण्यासारखा होता.
‘निशानची’ या चित्रपटाद्वारे ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो हे दोघं बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेतून पदार्पण करत आहेत. ट्रेलरमधूनच या दोघांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. दोघंही नवखे असूनही त्यांची परफॉर्मन्स क्वालिटी आणि स्क्रीन प्रेझेन्स पाहून इंडस्ट्रीतील अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे, ऐश्वर्य ठाकरे केवळ अभिनेता म्हणूनच नाही, तर गीतकार आणि संगीतकार म्हणूनही या चित्रपटातून डेब्यू करत आहेत. त्यामुळे त्यांचे हे पदार्पण अधिकच बहुआयामी आणि लक्षवेधी ठरत आहे.
चित्रपटातील एक खास गाणं “पिजन कबूतर भैया, उडन फ्लाय, लुक देखो आसमान इस्काय” सोशल मीडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झाले आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या जिभेवर चढलं असून, एक परफेक्ट ईअरवर्म ठरत आहे. त्यामुळे चित्रपट रिलीजआधीच संगीताची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. १९ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल केवळ प्रेक्षकांच्याच नव्हे तर इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांच्याही मोठ्या अपेक्षा आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनी ट्रेलरचं खुलेआम कौतुक केल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता दुप्पट झाली आहे. कथेत देसी मसाल्याचा टच असून अॅक्शन, ह्युमर आणि ड्रामाचा परफेक्ट मेळ यात अनुभवायला मिळणार आहे. शिवाय, ऐश्वर्य ठाकरे या चित्रपटात डबल रोलमध्ये झळकणार आहेत, ज्यामुळे त्यांचे पदार्पण अधिकच भव्य ठरणार आहे.
चित्रपटात ऐश्वर्य आणि वेदिकासोबतच मोनिका पनवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या सहभागामुळे कथानकाला अधिक गहिराई आणि वास्तववाद लाभणार आहे. जार पिक्चर्स (अजय राय आणि रंजन सिंग) आणि फ्लिप फिल्म्स यांच्या संयुक्त निर्मितीखाली तयार झालेल्या या चित्रपटाची कथा प्रसून मिश्रा, रंजन चंदेल आणि अनुराग कश्यप यांनी लिहिली आहे. या तिघांच्या लेखनातून उभ्या राहिलेल्या कथेला कश्यप यांचे दिग्दर्शन लाभल्याने, ‘निशानची’ हा एक फुल मसाला एंटरटेनर ठरणार असल्याची खात्री प्रेक्षकांना आहे.