अंकिता वालावलकरची वडिलांसाठी खास भावूक पोस्ट, जुन्या आठवणींमध्ये कोकण हार्टेड गर्ल भावूक
Ankita Walawalkar Shared Emotional Post For Her Father : सध्या सर्वत्र लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केली जातेय. गणेशोत्सव म्हटलं की, आपल्या नजरेसमोर आपसुकच कोकण येतोच. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी असलेले चाकरमानी गणेशोत्सवात कोकणात आपल्या मायभुमीत जातातच. अगदी सामान्यांपासून अनेक सेलिब्रिटी मंडळी सुद्धा याला अपवाद नाहीत. प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लूएंसर आणि ‘बिग बॉस मराठी ५’ फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिला यावर्षी गणेशोत्सवात कोकणात जायला मिळालं नाही. त्याचं कारण ठरलं ‘बिग बॉस मराठी ५’
सध्या ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये अंकिता वालावलकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. यामुळे तिला कोकणात यावर्षी गणेशोत्सवानिमित्त जायला मिळालं नाही. याची खंत तिने अनेकदा बिग बॉसच्या घरात बोलून दाखवली आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशीही अंकिता भावूक झाली होती. अशातच अंकिताने बिग बॉसच्या घरातून खास वडिलांसाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, तिने वडिलांचा डोक्यावर विसर्जनानंतरचा रिकामा पाट डोक्यावर रिकामा पाट घेऊन चालत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये तिने खास वडिलांना एक भावूक मेसेजही पाठवला आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये अंकिता म्हणते, “बाबा, आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडलेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले. पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे. लहानपणी मी ठरवलं होतं की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचा नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवत देखील नाही. तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते.”
“नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार,विसर्जन च्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हत.पण बिग बॉसच्या घरी असताना देखील खूप आधी मी हया सगळ्याची व्यवस्था करून आलेय,तुम्हाला काळजी करावी लागणार नाही, सातव्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील .काळजी करू नका गेल्यावर्षी बाप्पासोबत रात्री गप्पा मारल्या होत्या मी जेव्हा सगळे झोपले होते,आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी…”