फोटो सौजन्य - Social Media
सध्याच्या पिढीतील नात्यांच्या बदलत्या व्याख्या आणि पारंपरिक चौकटींना आव्हान देणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा आगामी मराठी चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा पहिला टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक विषयाला स्पर्श करणारा हा सिनेमा नव्या विचारांची झलक देतो. टिझर प्रदर्शित होताच सगळ्या प्रेक्षकवर्गाला हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
या चित्रपटात उमेश कामत आणि प्रिया बापट ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. टिझरमध्ये त्यांच्या नात्यातील गोडवा, सहजता आणि जिव्हाळा प्रेक्षकांना आकर्षित करतो. दोघंही लग्न न करताच एकत्र राहत आहेत आणि त्यांचं नातं एका वेगळ्या वळणावर पोहोचतं ते म्हणजे गरोदरपण! यात एक अनपेक्षित ट्विस्टही असून, त्यामुळे कथानक अधिक रंगतदार झालं आहे. चित्रपटात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून, त्यांची केमिस्ट्रीही पारंपरिक पलीकडची असल्याचे सूचित होत आहे. यामुळे या दोन पिढ्यांमधील नातेसंबंधांचा वेगळा दृष्टिकोन समोर येतो.
दिग्दर्शक आदित्य इंगळे सांगतात, “टीझरला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद खूपच दिलासा देणारा आहे. ही कथा फक्त लिव्ह-इन रिलेशनशिपची नव्हे, तर भावनिक गुंतवणुकीची आहे. उमेश आणि प्रिया यांचा अभिनय इतका सहज आहे की कथा खरी वाटते.” निर्माते नितीन वैद्य यांनी यावर भाष्य करताना सांगितले आहे की, “या चित्रपटाचं संकल्पनाच वेगळी आहे. परंतु तिच्यात ‘आपल्यातलंच काहीसं’ वाटणारी भावनिक झळाळी आहे. गिरीश ओक आणि निवेदिता सराफसारख्या अनुभवी कलाकारांनी ती भावना अजून खोलवर पोहोचवली आहे.”
हा चित्रपट गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी संयुक्तरीत्या निर्मित केला आहे. तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांच्या भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शनाची धुरा आदित्य इंगळे यांनी सांभाळली आहे. ‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, आधुनिक नात्यांची नवी वाट दाखवणारा अनुभव देणारा ठरेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.