
The Show Must Go On हे वाक्य ऐकलं किंवा वाचलं की पहिले आठवतात ते पडद्यावर काम करणारे कलाकार. चेहऱ्याला रंग लावून टिवल्या बावल्या करणारा सर्कशीतला जोकर आणि पडद्यावर आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा नट , या दोन्ही कलाकारांच्या आयुष्याचा एक नियम सारखाच आहे. तो नियम म्हणजे The Show Must Go On.
आयुष्यातील आव्हानांना दु:खांना दु:ख हसऱ्या चेहऱ्यामागे लपवून कलाकार माय बाप रसिकप्रेक्षकांच निखळ मनोरंजन करतात. आपल्या अभिनय शैलीने डोळ्यात टचकन पाणी आणणारे आपल्या अभिनयातून कलाकार जितके काळजाचा ठाव घेतात तसंच हसवून हसवून डोळ्यात पाणी आणणारे विनोदी कलाकार हे देखील मनोरंजनसृष्टीला लाभलेलं वरदान आहे. अशीच एक विनोदी अभिनेत्री या बॉलीवूड इंडस्ट्रीला लाभली होती. बॉलीवूडचा सुवर्णकाळ जिच्या शिवाय अपूर्ण आहे ती हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे ‘लाफ्टर क्वीन टुनटून’.
बॉलीवूडचा सुवर्णकाळ पडद्यावर पाहताना जितका आनंद देणारा आहे तेवढाच तो काळ अभिनेत्रींसाठी कठीण होता. ज्या काळात स्त्रि्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याला समाजाचा निरोध होता, त्या काळात स्त्रियांनी सिनेमात काम करणं म्हणजे चारीत्र्यावर शिंतोडे ओढवून घेणं होतं. मात्र समाजाच्या या चुकीच्या मानसिकतेला झुगारुन टुनटुनने देशातली पहिली विनोदी अभिनेत्री म्हणून लोकप्रियता मिळवली. काही कलाकार असे असतात की ज्यांचं फक्त नाव जरी एकलं तरी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य येतं. टुनटुन ही त्या कलाकरांपैकी एक आहे. अशी ही विनोदी अभिनेत्री आणि गोड गळ्याच्या गायिकेचं खरं नाव उमा देवी खत्री.
‘शामा’, ‘प्यासा’, ‘चौधवीन का चाँद’ , ‘फुल और पत्थर’ या आणि अशा बऱ्याच अजरामर सिनेमातून टुनटुनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. “अँखियों के झरोखों से, मैंने देखा जो सांवरे” हे गाणं आणि हा सिनेमा आजच्या प्रेक्षक वर्गालाही तितकाच भावतो. एकेकाळी गाजलेल्या या सिनेमात टुनटुनने एका जाड्या बाईची विनोदी भूमिका साकारली होती.
प्रेक्षकांना पोट धरुन हसवणाऱ्या या अभिनेत्रीचं बालपण मात्र आनंददायी नव्हतं. टुनटुनचा जन्म 11 जुलै 1923 चा. टुनटुन लहानाची मोठी उत्तर प्रदेशमध्ये झाली. ती तिच्या आईवडीलांना एकुलती एक होती. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या टुनटुनला तिचे आई वडील तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचे. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. जमिनीच्या वादावरुन जवळच्याच नातेवाईकांनी तिच्या आई वडीलांचा खून केला.
ज्या कोवळ्या वयात मुलांना आईवडीलांचं छत्र हवं असतं, त्याच नकळत्या वयात टुनटुनने तिच्या आई वडीलांना गमावलं. आई वडीलांच्या पश्चात तिचा सांभाळ ज्या नातेवाईकांनी केला त्यांनी तिला कायमच अनाथ असल्याची जाणिव करुन दिली. टुनटुनचं बालपण खूप खडतर होतं. नातेवाईक आणि समाजाने देखील तिला कायमच मोलकरणीची वागणूक दिली.
कोवळ्या वयातच मायेचं छत्र हरपलेल्या टुनटुनला आई वडिलांच्या प्रेमाला कायमचं पारखं रहावं लागलं. तिचं लहानपण देखील खूप खडतर गेलं. आव्हानांच्या वणव्यात आनंदाची हलकीशी झुळूक म्हणजे तिचं गाणं. टुनटुनकडे जन्मत: गोड गळा होता. वाट्याला आलेलं बिकट आयुष्य जगण्यासाठीच बळ तिला तिच्या आवाजाने दिलं होतं.
लहान असताना टुनटुन रेडिओवर गाणी लागली की तालासुरात गायची. याच रेडिओने तिला स्वप्न पाहायला शिकवलं. टुनटुला तिच्या गोड गळ्यावर प्रचंड विश्वास होता. त्यामुळे वयाच्य़ा तेविसाव्या वर्षी ती कोणाला ही न सांगता मुंबईत पळून आली. मोठ्या शहरात आल्यावर पुढच्या आव्हानांना कसं सामोरं जायचं हा तिच्यासमोर मोठा प्रश्न होता. यादरम्यान संगीतकार नौशाना अली यांच्याशी तिची भेट झाली. तिचा उपजत गोड आवाज ऐकून ते भारावून गेले.
टुनटुनने त्यानंतर ‘अफसाना लिख रही हूं दिल-ए-बेकरार का’ हे गाणं गायलं. तिच्य़ा या गाण्याला रसिकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. गाण्य़ाप्रमाणेच तिने ‘आवारा’ ,प्यासा’, कसम धंधे की’ या बऱ्याच सिनेमातून ती विनोदी अभिनेत्री म्हणून झळकली. आपल्या अभिनयाची दखल प्रेक्षकांना घेण्यास तिने भाग पाडलं. मात्र लोकप्रियता मिळवून देखील या अभिनेत्रीला कोणत्याही पुरस्काराने गौवरविण्यात आलं नाही, हीच सर्वात दु:खदायक बाब ठरली.
इतकं नाव कमवून देखील तिच्या शेवटच्या काळात आजारपणाशी लढताना तिची काळजी करणारं कोणीही सोबत नव्हतं. मृत्यूशी झुंज देताना मुंबईतल्या एका छोट्याशा खोलीत आजच्या दिवशी म्हणजे 24 नोव्हेंबर 2003 मध्ये तिचं निधन झालं. जिने दु:ख विसरुन जगाला खळखळून हसवलं त्या विनोदाच्या राणीचा अंत डोळ्यात पाणी आणणारा ठरला.