72 hoorain trailer
मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ ‘72 हुरें’ (72 Hoorain) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्पेशल स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात आता मुंबईत (Mumbai) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.(72 Hoorain Controversy)
‘72 हुरें’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. येत्या 7 जुलै रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘72 हुरें’चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय पूरण सिंग चौहान यांनी केले आहे. तर अशोक पंडित या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपट निर्मात्यांविरोधात मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सय्यद अरिफली महम्मदली यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात चित्रपट निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन होत असल्याचं सय्यद अरिफली महम्मदली यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप
आपल्या तक्रारीत सय्यद अरिफली महम्मदलीने म्हटले आहे की, ‘72 हुरें’ चित्रपटाने आपल्या धर्माचा अपमान केला आहे. हा चित्रपट जातीय भेदभाव आणि द्वेषाला प्रोत्साहन देणारा आहे. या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाची प्रतिमा मलीन होईल.
दरम्यान, ‘72 हुरें’ सिनेमाच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर काय कारवाई होते, हे पाहावे लागणार आहे.
काश्मीरमध्येही विरोध
दुसरीकडे काश्मीरमधील राजकीय पक्षांनी 72 हुरें चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. काश्मीरमधील राजकीय पक्षाने चित्रपटात दाखवलेल्या दहशतवाद्यांच्या मानसिक छळाच्या दृश्यांवर तीव्र आक्षेप घेतला आहे. चित्रपटात मांडलेल्या नकारात्मक गोष्टींमुळे विशिष्ट धर्माबद्दल लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसेच समाजावर विपरित परिणाम होईल असं काही राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे.